लेखक हवा की समीक्षक ते ठरवा
By admin | Published: October 9, 2016 02:40 AM2016-10-09T02:40:16+5:302016-10-09T02:40:16+5:30
मी लेखक असल्याने नवनिर्मिती करतो, तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता अर्ज भरलेले दुसरे उमेदवार अक्षयकुमार काळे हे नवनिर्मितीचा आस्वाद कसा घ्यायचा, हे शिकवतात.
- स्रेहा पावसकर, ठाणे
मी लेखक असल्याने नवनिर्मिती करतो, तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता अर्ज भरलेले दुसरे उमेदवार अक्षयकुमार काळे हे नवनिर्मितीचा आस्वाद कसा घ्यायचा, हे शिकवतात. समीक्षक हा चांगली कविता रसिकांपर्यंत पोहोचवतो, हे खरे असले तरी मुळात कविता रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिहावी लागते. त्यामुळे आता नवनिर्मिती करणारा अध्यक्ष हवा
की, त्याचा आस्वाद घ्यायला शिकवणारा अध्यक्ष हवा, याची
निवड लोकांनी करायची आहे, असे रोखठोक प्रतिपादन लोकप्रिय लेखक प्रवीण दवणे यांनी ‘लोकमत’कडे केले. दवणे यांनी शुक्रवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता अर्ज दाखल केला.
आजच्या तरुणांना उत्तम साहित्य देण्याची गरज आहे. साहित्य जगण्याला वैचारिक बैठक, जीवनाकडे पाहण्याचे भान आणि सूर देते.
हल्ली लिहिणारे लेखक खूप
आहेत, पण बोलणारे कमी आहेत. लेखनातून नवनिर्मितीचा आनंद घेणे आणि देणे, हा माझा उद्देश आहे. त्यामुळे या निवडणुकीत माझ्यासाठी कोणी प्रतिस्पर्धी नाही. अर्थात,
जोे जिंकेल त्याने काम पुढे न्यावे,
हीच इच्छा आहे. मी निवडणुकीसाठी काही तयारी केलेली नाही. माझी
१०० पुस्तके, शेकडो व्याख्याने
हीच माझी तयारी आहे, असे दवणे म्हणाले.
महाराष्ट्रवादी, विदर्भवादी हे विचार माझ्या मनात कधीच आलेले नाहीत. ग्रेसची कविता विदर्भातील, बहिणाबाई चौधरींची कविता खान्देशी म्हणून मी बघणार नाही. हा संकुचितपणा नष्ट होणे, हेच साहित्याचे संस्कार आहेत. अतिसामान्य माणसांची प्र्रादेशिकता आणि तत्सम बंधने गळून पडावी म्हणून भरपूर वाचन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
प्रदीर्घ लेखनसेवेचा सन्मान म्हणून अध्यक्षपद मिळाले पाहिजे. परंतु, ज्यांना ते मिळाले आहे, त्यांच्यापेक्षा कितीतरी माणसे त्यापासून दूर
राहिली आहेत. मंगेश पाडगावकर, इंदिरा संत अशा गुरुस्थानी असलेल्या मंडळींनी अध्यक्षपदाची इच्छा
व्यक्त केली असती, तर आम्ही हिम्मत केली नसती. मात्र, अलीकडच्या काळात एका विशिष्ट चौकटीत आपण बसलो की अध्यक्ष होता येते, असा समज निर्माण झाला आहे. त्यामुळे साहित्य आणि साहित्यिक अध्यक्षपदापासून दूर गेल्याचे चित्र दिसू लागले.
माझी साहित्यसंपदा लक्षात
घेत आपण का प्रयत्न करू नये, असे मला वाटले, असे दवणे म्हणाले. हल्ली विविध भाषांचे संकर मराठीत मिसळत चालले आहे. त्यामुळे भाषा संपन्न होण्याऐवजी तिचा मूळ चेहरा हरवत चालला आहे, असे दवणे म्हणाले.
राजकीय व्यक्तीही साहित्यिक, रसिक असतात
एखादी व्यक्ती राजकारणात आहे म्हणून ती वाचक नाही, असे म्हणू नये. या क्षेत्रातील अनेक व्यक्ती साहित्यिक, रसिक असतात. त्यामुळे संमेलनात ‘राजकारण्यांची लुडबूड’ हा शब्द चुकीचा वाटतो.
अर्थात, त्यांनी स्वत:चे शक्तिप्रदर्शन करू नये. त्यांनी कार्यक्रमाला यावे, ऐकावे, पुस्तके विकत घ्यावी, आवडत्या साहित्यिकांशी चर्चा करावी, असे दवणे म्हणाले.
मी ‘आपला माणूस’
डोंबिवली ही माझी अध्ययनभूमी आहे. त्यामुळे मला जर अध्यक्ष होण्याची संधी मिळाली, तर मुलीला माहेरी जाण्याची संधी मिळते, तेव्हा आईला जसे बरे वाटते, तसे डोंबिवलीला वाटेल, असे ते म्हणाले. माझ्या जडणघडणीत स.वा. जोशी हायस्कूल, काव्य रसिक मंडळ, साहित्य सभा, डोंबिवलीच्या नगरपालिकेचे ग्रंथालय यांचा खूप मोठा वाटा आहे.
पु.भा. भावे, शं.ना. नवरे आणि प्रभाकर अत्रे या दिग्गज लेखकांची सावली मला मिळाली. शाळकरी मुलगा ते लेखक असा सगळा प्रवास डोंबिवलीतच झाला. त्यामुळे डोंबिवलीकरांसाठी मी आपला माणूस आहे, असे दवणे यांनी आवर्जून सांगितले.
राजकीय व्यक्तीचं प्यादं होणे चुकीचे : मला माझ्या वाचकांनी, रसिकांनी संधी दिली तर माझा सन्मान आहे. मात्र, एखादी व्यक्ती निवडून यावी, ही तेथील सामाजिक किंवा राजकीय व्यक्तीची इच्छा असते आणि ती व्यक्ती जेव्हा त्यांचं प्यादं बनते, तेव्हा गोंधळ सुरू होतो. कोणी अमुक म्हणतो म्हणून मी अर्ज केलेला नाही.
संमेलनाध्यक्षाकरिता प्रथमच निवडणूक : अध्यक्षपदासाठी मी पहिल्यांदाच अशी निवडणूक लढवत आहे. यापूर्वी निवडणुका न झालेल्या इंदूर येथील शारदा संमेलन, बडोदा साहित्य संमेलन, जलसाहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन, मुंबई मराठी ग्रंथालयाचे संमेलन आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा दुबई येथे झालेला पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा याचे अध्यक्षपद मी भूषवलेले आहे.