दलित मतांची फूट निश्चित
By Admin | Published: February 9, 2017 05:01 AM2017-02-09T05:01:03+5:302017-02-09T05:01:03+5:30
मुंबईसह राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये दलित मतांसाठी सर्वच पक्षांनी रिपब्लिकन गटांशी सलगी केलेली आहे.
चेतन ननावरे, मुंबई
मुंबईसह राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये दलित मतांसाठी सर्वच पक्षांनी रिपब्लिकन गटांशी सलगी केलेली आहे. परिणामी यंदाच्या निवडणुकीतही दलित मतांची विभागणी अटळ मानली जात आहे.
याआधी रिपब्लिकनच्या विविध गटांसोबत काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने युती केली होती. मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता पुढाकार घेतला आहे. काँग्रेसने भारिप बहुजन महासंघासह पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सोबत घेतले होते. त्यातून भारिपने बाहेर पडत यंदा तिसरी आघाडी निर्माण केली आहे.
याउलट भाजपाने रिपाइंच्या रामदास आठवले यांना सोबत घेतले आहे, तर शिवसेनेने रिपाइंच्या
अर्जुन डांगळे यांना सोबत घेत दलित मतांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
दलित मतांसाठी रिपब्लिकन चेहरा नसलेल्या राष्ट्रवादीने अखेर रिपाइंच्या खरात गटाशी सलगी केलेली आहे. रिपाइं खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी प्रचारात उतरली आहे. याउलट रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे एरव्ही दलितांच्या हक्कांसाठी आंदोलनात व्यस्त असलेल्या रिपब्लिकन नेत्यांना राजकीय
वर्तुळात मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत.