भागीदारी व्यवसायाची व्याख्या, वैशिष्ट्ये, फायदे आणि तोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:18 AM2018-02-11T01:18:18+5:302018-02-11T01:18:30+5:30
मागील लेखात आपण प्रोप्रायटरी व्यवसायाचे सात प्रमुख तोटे पाहिले. या लेखांतर्गत आपण पार्टनरशिप फर्म प्रकारच्या म्हणजे भागीदारी व्यवसाय प्रकाराचे विश्लेषण करू आणि त्यांची तोंडओळख करून घेऊ.
- प्रतीक कानिटकर
मागील लेखात आपण प्रोप्रायटरी व्यवसायाचे सात प्रमुख तोटे पाहिले. या लेखांतर्गत आपण पार्टनरशिप फर्म प्रकारच्या म्हणजे भागीदारी व्यवसाय प्रकाराचे विश्लेषण करू आणि त्यांची तोंडओळख करून घेऊ.
व्यवसायातील विस्तारिकरणासाठी अधिक भांडवल आणि व्यवस्थापकीय कौशल्य आवश्यक असते आणि म्हणूनच दोन किंवा अधिक व्यावसायिक एकत्र येतात व भागीदारी संस्थेची स्थापना करण्यात येते, व्यवसाय उपक्र म आयोजित करण्यात येतो आणि करार आणि भांडवली करारानुसार नफा व तोटा वाटून घेण्यात येतो. या स्वरूपाचा व्यवसाय अधिक भांडवल उभारणी, कामाची विभागणी, तसेच व्यवहार देखरेखीसाठी उपयुक्त ठरतो. जे भागीदारी व्यवसायाच्या प्रकारात व्यवसाय करतात, ते वैयक्तिकरित्या भागीदार (पार्टनर) म्हणून ओळखले जातात आणि एकित्रतपणे पार्टनरशिप फर्म (भागीदारी संस्था) म्हणून ओळखले जातात. आता आपण पार्टनरशिप फर्मचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ.
भागीदारी व्यवसायाचे फायदे
मोठे भांडवल :
एकल स्वायत्तेतेच्या (प्रोप्रायटरशिप) तुलनेत भागीदारांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे व्यवसायामध्ये अधिक भांडवल उभारले जाऊ शकते.
अनुकूल स्वायत्तता:
भागीदारीमधील प्रत्येक भागीदाराची देयता अमर्यादित असल्याने भागीदारी संस्था पद्धतीमध्ये कर्जदारांच्या दृष्टीने या प्रकारची संस्था चांगली स्वायत्तता (क्रेडिट रेटिंग) प्राप्त करते आणि म्हणून वित्तीयसंस्था, बँका या प्रकारच्या व्यवसायाला कर्ज उपलब्ध करून देतात.
कामाची विभागणी:
भागीदार त्यांच्या कौशल्यांनुसार व्यवसाय चालविण्याची जबाबदारी वाटून घेऊ शकतात, ज्यामुळे व्यवसायवृद्धी संभवते.
व्यवसाय नामकरण:
भागीदारी संस्थेचे नाव नोंदणीकृत केले जात नाही, म्हणजेच भागीदार आपल्या संस्थेसाठी कोणतेही नाव निवडू शकतात. तथापि, भागीदारांनी नेहमी सावध राहावे व हे सुनिश्चित करावे की, निवडलेल्या नावात तिसºया व्यक्तीचे ट्रेडमार्क किंवा कॉपीराइटचे उल्लंघन होणार नाही.
सुलभ रचना:
भागीदारी संस्थेची नोंदणी अनिवार्य नाही. त्यामुळे भागीदारी कार्यात प्रवेश केल्यानंतर भागीदार लगेच व्यवसाय सुरू करू शकतात. तथापि, भागीदारी संस्थेची नोंदणी नेहमीच उचित असते.
भागीदारी व्यवसाय प्रकारचे तोटे:-
अमर्यादित वैयक्तिक जोखीम/अमर्यादित नुकसान दायित्व:-
‘पार्टनरशिप अॅक्ट, १९३२, अंतर्गत भागीदार असलेल्या भागीदारीमध्ये असीम उत्तरदायित्व आहे असे म्हटले जाते, म्हणजेच अमर्यादित वैयक्तिक जोखीम / अमर्यादित नुकसान दायित्व. कारण भागीदार हा भागीदारीच्या संस्थेने केलेल्या व्यापारातील नुकसानासाठी वैयक्तिकरीत्या जबाबदार असतो. म्हणजेच प्रत्येक भागीदार व्यवसायाचे उत्तरदायित्व आणि आर्थिक जोखमी शेअर करतात. भागीदारांचे दायित्व संयुक्तपणे आणि वैयक्तिकरीत्यादेखील अमर्यादित आहे.
असहमती-
भागीदारीतील सर्वात स्पष्ट तोटा म्हणजे, भागीदारांमधील मतभेदांचा धोका. भागीदारांमध्ये मतभेद आीण विवाद होऊ शकतात, ज्यामुळे व्यवसायावर दुष्परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच निर्मितीच्या कालावधीतच भागीदारांमध्ये एक करारनामा असणे हे हिताचे ठरते.
व्यवस्थापनातील अलवचिकता
सर्व भागीदारांच्या संमतीशिवाय भागीदार आपला समभाग कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीकडे हस्तांतरित करू शकत नाही आणि यामुळे व्यवसायवाढीस निर्बंध येतात.
स्वतंत्र कायदेशीर स्थितीचा अभाव:
प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखे भागीदारी संस्थेस स्वत:चे वेगळे अस्तित्व नाही. कायद्याने भागीदारी संस्था स्वतंत्र म्हणून ओळखली जात नाही. संस्थेचे अस्तित्व भागीदारांशी संबंधित आहे. भागीदाराची दायित्व भागीदारी संस्थेचे दायित्व म्हणून संबोधले जाते.
निरंतरतेचा अभाव:
भागीदारी संस्था, भागीदाराच्या मृत्यूमुळे, दिवाळखोरीमुळे किंवा भागीदाराच्या निवृत्तीमुळे बंद करावी लागते. जर फक्त दोन भागीदार असतील, तर त्यापैकी एकाच्या मृत्यूवर भागीदारी संस्थेचे विघटन करणे आवश्यक आहे.
सार्वजनिक विश्वासाचा अभाव:
आज ग्राहक, विक्रेते आणि गुंतवणूकदार व्यवसायात विश्वसनीयता शोधतात. ‘भागीदारी संस्था’ म्हणून व्यवसाय सुरू केल्यास, संस्थेचे नाव कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे नोंदणीकृत नसते. त्यामुळे बºयाचदा, व्यवसायाच्या अस्तित्वाचा विश्वासार्ह पुरावा नसतो.
भागीदाराच्या चुकीच्या निर्णयाचा धोका:
प्रत्येक भागीदार भागीदारी व्यवसायासाठी जबाबदार असतो. म्हणजेच एका भागीदाराने घेतलेले सर्व निर्णय सर्व भागीदारांना बांधील असतात. काही वेळा भागीदाराच्या चुकीच्या निर्णयामुळे इतर भागीदारांनाही तो धोका पत्करावा लागतो. कमी कायदा पालन व मोठे भांडवल उभारण्यासाठी, पुष्कळ उद्योजक ‘भागीदारी संस्था’ (पार्टनरशिप फर्म) या प्रकारच्या व्यवसायाची निवड करतात, परंतु उद्योजकाने व्यवसाय वृद्धिंगतीनुसार व्यवसाय पद्धतीतही बदल अंगीकारणे अपेक्षित आहे.