Join us

गुजराती मते निर्णायक

By admin | Published: January 23, 2017 6:10 AM

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युतीबाबत अजून अनिश्चितता आहे. जर युती झाली नाही, तर मुंबई महानगरपालिकेच्या

मनोहर कुंभेजकर / मुंबईआगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युतीबाबत अजून अनिश्चितता आहे. जर युती झाली नाही, तर मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांपैकी गुजराती नागरिकांचे प्राबल्य असलेल्या सुमारे २५ प्रभागांतील गुजराती मतांची व्होट बँक शिवसेनेसाठी निर्णायक ठरू शकते. असे असतानाच शिवसेनेकडे काही गुजराती समाजातील नेत्यांचेही इनकमिंग झाले आहे. त्यामुळे या २५ प्रभागांमध्ये ताकद वाढल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.१५ डिसेंबरला सेना भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बृहन्मुंबई गुजराती समाजाचे अध्यक्ष हेमराज शहा यांना शिवबंधन बांधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला. या वेळी काँग्रेसच्या मुंबई विभागाचे गुजराती सेलचे अध्यक्ष भरत दनानी यांच्यासह २५० गुजराती समाज बांधवांनी सेनेत प्रवेश केला. हेमराज शहा यांना मानणारा मोठा गुजराती वर्ग आहे. मुंबईत मराठी मतदार आता २२ टक्के राहिला असून, केवळ मराठी मतांच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार नाहीत. त्यामुळे शिवसेनेने गुजराती, उत्तर भारतीय आणि अन्य धर्मांच्या मतदारांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. तसेच शिवसेनेने गुजराती समाजातील १० जणांची टीम तयार केली असून, ही टीम गुजराती बांधवांच्या घरोघरी जात शिवसेनेचा प्रचार करणार आहे. सोशल मीडियाद्वारेही गुजराती बांधवांच्या संपर्कात शिवसेना असल्याची माहिती हेमराज शहा यांनी दिली.शिवसेना आणि गुजराती बांधवांचे नाते हे शिवसेनाप्रमुखांपासून आहे. केंद्र सरकारने हिरे व्यापाऱ्यांवर लावलेला १ टक्का कर आणि नंतर नोटाबंदीमुळे त्यांच्या उद्योगात आलेली मंदी, वाढती बेकारी यामुळे गुजराती बांधव मोदी सरकारवर नाराज आहेत. शिवसेनेकडून गुजराती बांधवांना न्याय मिळेल; त्यामुळे गुजराती समाज, व्यापारी वर्ग शिवसेनेत मोठ्या संख्येने सामील होत आहे, असे हेमराज शहा यांनी सांगितले. भाजपा, काँग्रेससह उर्वरित पक्षांचे नगरसेवक आणि गुजराती बांधवही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.