- गौरीशंकर घाळेसकाळी ८-९ वाजता जसंपर्क कार्यालय गाठायचे. आल्या-गेल्यांच्या पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजची समस्या सोडविण्यापासून भागातील न उचललेल्या कचऱ्यासाठी पालिकेची गाडी मोबलाईज् करायची. इथपासून अॅडमिशन, पत्र, घरगुती भांडण. बारशापासून मयतापर्यंत आवर्जून हजेरी लावायची. दिवसभर लोकांमध्ये, लोकांभोवती फिरणारी नेत्यांची एक विशिष्ट कुळी मुंबईत पाहायला मिळते. अशा नेत्यांचा वारू लाटेतही तरून जातो. मागाठाणे विधानसभेतील शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचे अशा नेत्यांमध्ये नाव घेता येईल. तुटलेली युती आणि मोदी लाटेतही सुर्वे यांनी मागाठाणे विधानसभा राखली. पुढे महापालिका निवडणुकीतही आठपैकी सात जागा खिशात घालत शिवसेनेने आपला वरचष्मा कायम ठेवला.केतकीपाडा, अशोकवन, दामूनगर तसेच श्रीकृष्णनगर, अभिनव, रहेजा, गुलमोहर, टाटा पॉवर, राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ते नव्याने उदयाला आलेले ठाकूर व्हिलेज असा पसरलेला हा मतदारसंघ. विविध भाषिकांच्या या बहुढंगी मतदारसंघावर निर्णायक भूमिकेत मात्र मराठी मतदार असतो. पश्चिम उपनगरात दिवसेंदिवस मराठी टक्का आकसत गेल्याने अनेक ठिकाणी अन्य भाषिक गट निर्णायक भूमिकेत गेले. मागाठाण्यात आजही अशोकवन ते ठाकूर व्हिलेज व्हाया दामूनगर या पट्ट्यातील मराठी मते ज्याला मिळाली तोच विजयी ठरतो. २०१४ च्या विधानसभेत ती शिवसेनेच्या सुर्वेंना मिळाली. त्याआधी मनसेच्या लाटेत प्रवीण दरेकरांना मिळाली.मतदारसंघात आता दोन आमदार आहेत. विधानसभेत प्रकाश सुर्वे आणि विधान परिषदेत प्रवीण दरेकर. स्थानिक पातळीवर या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष नित्याची बाब आहे. राजकीय वातावरण तापले की एकमेकांचे हिशेब चुकते करण्यासाठी विषय उकरून काढले जातात. मात्र, त्याचा लोकसभा निवडणुकीत फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. भांडणारे दोन आमदार आता युतीचे शिलेदार आहेत. त्यांच्या भांडणामुळे चुकूनमाखून युतीच्या उमेदवाराला फटका बसलाच तर हीच आकडेवारी विधानसभेवेळी पत्ता कापण्यासाठी वापरली जाण्याची शक्यता आहे. शिवाय, शेट्टी यांचा या दोन्ही आमदारांशी संघर्ष वगैरे नाही.मतदारसंघातील राष्ट्रीय उद्यानाच्या लाभार्थ्यांची संख्या जशी आहे तशीच त्रासलेल्यांची. हा प्रश्न जटिलच होतोय. १९५० पासूनचा ७/१२ असूनही ५० हजार लोक आजही विस्थापितांप्रमाणे जगताहेत. तर, ५-१० हजार आदिवासींचे ना पुनर्वसन होतेय ना त्यांना सुविधा मिळताहेत. जोडीलाच वाहतूककोंडी, झोपडपट्ट्यांतील नागरी समस्या आणि रखडलेले प्रश्न इथेही आहेत. फेरीवाल्यांमुळे त्रासलेल्या नागरिकांनी आंदोलन केल्याचे दृश्य इथल्याच ठाकूर व्हिलेजमध्ये पाहायला मिळाले. या सर्वांचा लोकसभा निवडणुकीत प्रभाव पडेल का, याचे उत्तर आजतरी नकारात्मक आहे.राजकीय घडामोडीमागाठाण्यातील मुख्य सत्तासंघर्ष भाजपा आणि शिवसेनेत आहे. मात्र, दोन्ही पक्षांना गेल्या काही वर्षांपासून जुने आणि नवे या वादाला तोंड द्यावे लागत आहे. प्रकाश सुर्वे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. त्यामुळे निष्ठावंत नाराज. तर, मनसेतून आलेल्या प्रवीण दरेकरांना थेट विधान परिषद दिली गेल्याने जुने भाजपाई नाराज, अशीच येथील अवस्था आहे.सुर्वे यांच्या पक्षांतराने उत्तर मुंबईतील राष्ट्रवादीच्या अस्तित्वालाच धक्का बसला. जे काही थोडेफार नेते, कार्यकर्ते उरले होते ते महापालिका निवडणुकीपूर्वी पांगले. त्यामुळे आता राष्ट्रवादी नगण्य बनली आहे.
मागाठाणेत मराठी मतदाराची भूमिकाच ठरणार निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 1:20 AM