शहरीकरणामुळे कांदळवनाचा ऱ्हास; कांदळवन अबाधित राखण्यासाठी आता पथदर्शी प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 11:58 AM2022-05-24T11:58:42+5:302022-05-24T11:59:31+5:30

जैवविविधतेच्या दृष्टीने कांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबई महानगरपालिका, प्रकल्प मॅन्ग्रोव्ह सेल यांच्या संयुक्त विद्यमाने पथदर्शी प्रकल्प लवकरच राबविला जाणार आहे.

deforestation due to urbanization now a pilot project to keep kandalvan intact | शहरीकरणामुळे कांदळवनाचा ऱ्हास; कांदळवन अबाधित राखण्यासाठी आता पथदर्शी प्रकल्प

शहरीकरणामुळे कांदळवनाचा ऱ्हास; कांदळवन अबाधित राखण्यासाठी आता पथदर्शी प्रकल्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जैवविविधतेच्या दृष्टीने कांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबई महानगरपालिका, प्रकल्प मॅन्ग्रोव्ह सेल यांच्या संयुक्त विद्यमाने पथदर्शी प्रकल्प लवकरच राबविला जाणार आहे. महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित व इर्न्व्हामेंटल रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंबंधीत इतर एजन्सींमधील समन्वय सुलभ होणार आहे. 
    
झपाट्याने वाढणार्‍या शहरीकरणामुळे कांदळवनाचा ऱ्हास हे मुंबई शहरासाठी चिंतेचे कारण बनले आहे. विशेषत: समुद्राची वाढती पातळी आणि त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून शहराला वाचविणे गरजेचे आहे. किनारपट्टीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने कांदळवनाचे महत्त्व नाकारता येणार नाही. अनियोजित विकास, कचऱ्याची अशास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट, विशेषत: किनारपट्टीच्या भागात आणि कांदळवनाची झाडे जाळणे ही या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत. या प्रकल्पाव्दारे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट आणि कांदळवनाच्या अधिवासातून बांधकाम आणि विध्वंस कचरा काढून त्यांचे पुनर्वसन सुलभ करण्यासाठी योजना विकसित केली जाणार आहे.

हा पथदर्शी प्रकल्प महानगरपालिकेच्या पी-उत्तर प्रभागातील कांदळवनाच्या हॉटस्पॉटसाठी प्रस्तावित आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्याचे प्रमाणीकरण, कांदळवनापासून कचरा काढून टाकण्यासाठी योजना विकसित करणे आणि मोक्याच्या ठिकाणी चेकपोस्ट - 'चौकी' स्थापन करून पुनर्वसित ठिकाणी या कचऱ्याचे भविष्यात डंपिंग रोखणे यांचा समावेश आहे. योग्य पध्दतीने योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी संबंधित विभाग आणि एजन्सींचे समन्वयन हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे.

मुंबईची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि विशेषत: वाढत्या वसाहतींना तेथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अधिक जागा आवश्यक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा, मुख्यत्वे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट  आणि बांधकाम आणि विध्वंस कचरा गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या किनारपट्टीवर असलेल्या कांदळवनाच्या जंगलांमध्ये त्यांचा मार्ग शोधत आहे. या बदलामुळे नाजूक तरीही अत्यंत मौल्यवान, कांदळवनाची परिसंस्था नष्ट झाली आहे.

कांदळवनाच्या परिसंस्थेचे महत्त्व त्यांच्या जैवविविधतेच्या दृष्टीने, किनारपट्टीवरील धूप, प्रदूषण, त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करणे, स्थानिक समुदायांसाठी उपजीविकेचे साधन म्हणून त्यांचा वापर होणार आहे.  कांदळवनाच्या पुनरुत्पादनासाठी सक्षम वातावरण तयार करण्यासाठी हे पहिले पाऊल असेल. 

मॅन्ग्रोव्ह सेल आणि महापालिकेद्वारे संयुक्तपणे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी,  निवृत्त सनदी अधिकारी अजित कुमार जैन,  महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, मॅन्ग्रोव्ह सेलचे एम. आदर्श रेड्डी, महाप्रितचे मुख्य महाव्यवस्थापक एस. सी. कोल्लूर आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. 

कांदळवनातील कचरा काढण्याची कोणतीही योजना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या समितीकडे सादर केल्यास ती लवकरात लवकर मंजूर करण्यात येईल, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.

महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी प्रकल्प रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात घेण्याचा मानस असल्याची माहिती त्यांनी दिली.

अजित कुमार जैन यांनी देशभरात आढळून आलेले हवामान बदल आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत असामान्यपणे वाढ होत असताना कांदळवनाचे संवर्धन करण्याची निकड नमूद केली.

Web Title: deforestation due to urbanization now a pilot project to keep kandalvan intact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.