Join us  

राज्यात पदवी प्रवेशाच्या जागा रिक्त; पदवीसाठी विद्यापीठाकडून स्कूल कनेक्ट अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 7:11 AM

बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी त्यांच्या अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून दूर जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील महाविद्यालयांतील प्रथम वर्षाच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात प्रवेश नोंदणी होऊन जागा रिक्त राहत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी त्यांच्या अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून दूर जात आहेत. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अभ्यासक्रमांची माहिती देऊन प्रवेशाचे नोंदणी प्रमाण वाढवण्यासाठी विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्ट अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अभियान प्रत्येक विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या माध्यमातून १५ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान, राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापन करून कनिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न करून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी समितीला विद्यापीठाच्या परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क करून कार्यशाळा घ्याव्या लागणार आहेत.

पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना एनईपीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी संपर्क अभियान विद्यापीठांना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विविध रचनांमध्ये असलेल्या लवचिकता, इंटर्नशिप, एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रम, पीएच.डी. अभ्यासक्रम यांची माहिती विद्यापीठांनी द्यायची आहे.

‘स्कूल कनेक्ट’ची उद्दिष्ट्ये काय?

  • एनईपी २०२० मधील विद्यार्थीकेंद्री बदलांविषयी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणे.
  • विद्यापीठांनी तयार केलेल्या अनुभवाधिष्ठित, बहुविद्याशाखीय लवचिक अभ्यासक्रमांविषयी सविस्तर माहिती देणे.
  • अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट असलेली कल्पक, व्यावसायिक आणि कौशल्यावर आधारित माहिती देणे.
  • मूल्यमापनातील श्रेयांक पद्धती आणि त्यामुळे आलेली लवचिकता समजावून सांगणे.
  • विद्यापीठाच्या विद्यार्थी सहायता कक्षाविषयी माहिती देणे. 
  • विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधी विषयी माहिती देणे.
टॅग्स :मुंबई विद्यापीठ