Join us

पनवेलमधील देहरंग धरण होणार गाळमुक्त

By admin | Published: May 24, 2016 1:56 AM

सात दशकांपासून पनवेलकरांची तहान भागविणाऱ्या देहरंग धरणातील गाळ लोकसहभागातून काढण्यास सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी २ फोकलेन, ७ जेसीबी व जवळपास ८० डंपरच्या

- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली

सात दशकांपासून पनवेलकरांची तहान भागविणाऱ्या देहरंग धरणातील गाळ लोकसहभागातून काढण्यास सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी २ फोकलेन, ७ जेसीबी व जवळपास ८० डंपरच्या सहाय्याने गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. दहा वर्षांपासून सातत्याने जमा झालेला गाळ पाऊस सुरू होण्यापूर्वी काढला जाणार असल्याने पनवेलकरांनी पुढील वर्षी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. पनवेल ही धरण बांधणारी देशातील पहिली व एकमेव नगरपालिका आहे. माथेरान डोंगराच्या पायथ्याशी जवळपास २७७ हेक्टर नगरपालिकेच्या मालकीची असून त्यामध्ये १२३ हेक्टर जमिनीवर धरण आहे. १९४७ मध्ये प्रत्यक्षात धरण पूर्ण होवून शहराला मुबलक पाणीपुरवठा सुरू झाला. ७० वर्षांपासून देहरंग हा पाण्यासाठीचा प्रमुख स्रोत राहिला आहे. परंतु मागील काही वर्षांमध्ये धरणामधील गाळ काढलेला नव्हता. २६ जुलै २००५ मधील अतिवृष्टीमुळे माथेरानच्या डोंगरावरील माती वाहून धरणात आली. तेव्हापासून जवळपास दहा वर्षे पाण्यापेक्षा गाळानेच धरण जास्त भरले होते. साठवण क्षमताच कमी झाल्याने शहरवासीयांना एमजेपी व सिडकोवर अवलंबून रहावे लागले. यापूर्वी २०१० मध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे नगराध्यक्ष असताना धरणातील गाळ काढण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी गाळ काढण्यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली होती. परंतु प्रत्यक्षात पुरेसा गाळ काढता आला नव्हता. राज्य शासनाने धरणातील गाळ लोकसहभागातून काढून तो शेतीसाठी वापरण्याचे धोरण निश्चित केले आहे. याशिवाय गाळ काढण्यासाठी रॉयल्टी आकारण्यात येणार नाही. नगराध्यक्षा चारूशीला घरत, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी महसूल विभागाकडे पाठपुरावा करून धरणातील गाळ काढण्यासाठी पाठपुरावा केला होता. नगरपालिकेच्या मागणीची दखल घेवून प्रांताधिकारी भरत शितोळे, तहसीलदार दीपक आकडे,नायब तहसीलदार बी. टी. गोसावी यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांनीही लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. खा. श्रीरंग बारणे, आ. प्रशांत ठाकूर यांनीही मदतीचा हात पुढे केला. लोकसहभागातून दोन फोकलेन, ७ जेसीबी व ८० डंपर उपलब्ध झाले आहेत. पहिल्यांदाच गाळ काढण्यासाठी एवढी यंत्रसामग्री मोफत मिळाली आहे. - धरणामधील गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी पूर्ण रायगड जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून देहरंग धरणातील गाळ काढला जात आहे. धरण गाळमुक्त करण्यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधींनीही सहकार्य केले असून जेसीबी, फोकलेन, डंपर मोफत उपलब्ध करून दिले आहे. धरणातील गाळ काढण्यासाठी शासन रॉयल्टी आकारणार नाही याशिवाय शेतकऱ्यांनाही माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी शीतल उगले यांनीही धरणाच्या ठिकाणी भेट देवून गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. लोकसहभागातून धरणातील गाळ काढला जात आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीही सहकार्याचा हात पुढे केला आहे. ३५ ते ४० हजार क्युबीक मीटरपेक्षा जास्त गाळ काढला जाणार आहे. मंगळवारपासून अजून काही जेसीबी व डंपर मोफत उपलब्ध होणार असून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याप्रमाणात गाळ काढण्याचे काम होत आहे. - मंगेश चितळे, मुख्याधिकारी, नगरपालिका