मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बदलासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महायुतीतील सर्वांत मोठ्या पक्षाचा नेता म्हणून मी अतिशय अधिकृतपणे सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. दुसरे कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही बदल होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मात्र, फडणवीसांच्या या विधानावर प्रत्युत्तर देताना, देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नाहीत, असा पलटवार शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत कुणीही संभ्रम पसरवू नये, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील नेत्यांना व कार्यकर्त्यांना केले. तर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना अशी पतंगबाजी करावी लागते, असे म्हणत टोलाही लगावला होता. आता, फडणवीसांच्या या विधानावर संजय राऊत यांनी भूमिका मांडताना त्यांना टोला लगावला. देखल्या देवा दंडवत, असे म्हणत बोचरी टीका केली. देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नाहीत, किंवा विधानसभेचे अध्यक्ष नाहीत. त्यामुळे, आम्ही जेव्हा सांगतो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, तेव्हा आमचं बोट सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेसंदर्भात दिलेल्या निर्देशांचं पालन विधानसभा अध्यक्षांनी केलं तर, देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत त्या बोलण्याला काही अर्थ नाही, तथ्य नाही, असे म्हणत शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदावर भाष्य केलं. तसेच, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, या फडणवीसांच्या विधानावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
देवेंद्र फडणवीसांना हे पक्क माहिती आहे, पण देखल्या देवा दंडवत ही मराठीत म्हणा आहे, पण सूर्य माळवणारच आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, आता ३ महिने होत असून लवकरच निर्णय घ्यावा लागेल, असेही राऊत यांनी म्हटले.