Join us

कोकणात नौदल व तटरक्षक दलांना मदतीसाठी बोलविण्यात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:06 AM

मुंबई : कोकणात मागील पाच दिवसापासून पूरसदृश परिस्थिती असतानासुद्धा राज्य सरकारने नौदल व तटरक्षक दलाला बोलविण्यासाठी शुक्रवारी पत्र दिले. ...

मुंबई : कोकणात मागील पाच दिवसापासून पूरसदृश परिस्थिती असतानासुद्धा राज्य सरकारने नौदल व तटरक्षक दलाला बोलविण्यासाठी शुक्रवारी पत्र दिले. त्यामुळे वेळेत मदत न पोहोचल्यामुळे २०० पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हे अत्यंत संतापजनक असून मुख्यमंत्री व राज्य सरकारच्या या अनास्थेची व दिरंगाईची न्यायिक चौकशी करण्याची मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

पावसाळा सुरू होतानाच कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी नौदल व तटरक्षक दलाच्या तुकड्या सज्ज असतात. राज्य सरकारकडून त्यांना आदेश येताच ते तात्काळ मदतकार्य सुरू करतात. बुधवारी रात्रीपासून संपूर्ण चिपळूण शहर पाण्याखाली गेले असताना व गुरुवारी सकाळी तळीये येथे दरड कोसळली असताना राज्य सरकारने तात्काळ तटरक्षक दल व नौदलाला मदतीसाठी लेखी आदेश देण्याची आवश्यकता होती.

राज्यातील गंभीर पूरस्थिती लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारीच मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा केली व आवश्यक सर्व मदत करण्याचे आश्वासनसुद्धा दिले होते. परंतु ठाकरे सरकारला मदतीचे पत्र लिहिण्यासाठी २४ तास लागले. ही दिरंगाई अक्षम्य असून अजून किती लोकांचे बळी घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला जाग येणार आहे, असा सवालसुद्धा आमदार भातखळकर यांनी केला आहे.