स्पाइसजेटचे उड्डाण रद्द होण्यासह झालेल्या विलंबामुळे प्रवासी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 06:08 AM2019-07-14T06:08:09+5:302019-07-14T06:08:16+5:30
पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे जाण्यासाठी स्पाइसजेटच्या विमानाची तिकिटे आरक्षित केलेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे जाण्यासाठी स्पाइसजेटच्या विमानाची तिकिटे आरक्षित केलेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. शुक्रवारी विमान रद्द झाल्यानंतर, शनिवारी या विमानाच्या उड्डाणाला तीन तास विलंब झाल्याने संतप्त प्रवाशांनी कामकाजाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी काही प्रवाशांनी विमानाचे उड्डाण रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर सव्वातीन तासांनंतर या विमानाने उड्डाण केले.
शुक्रवारी सकाळी ७.५० वाजता स्पाइसजेटचे एसजी ६३५४ हे विमान उड्डाण करणार होते, मात्र आॅपरेशनल कारणांमुळे उड्डाण रद्द करण्यात आले. या विमानाच्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा घेणे किंवा शनिवारच्या विमानाने जाणे हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. त्यानुसार काही प्रवाशांनी परतावा घेतला तर काहींनी शनिवारच्या विमानाने जाण्याचा मार्ग स्वीकारला. मात्र शनिवारी सकाळी ७.५० वाजता उड्डाण होण्याऐवजी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. त्यामुळे दोन वेळा विमानाच्या उड्डाणाची घोषणा करूनही प्रत्यक्षात हे उड्डाण पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर काही तासांनी विमान उड्डाणास तयार असल्याची घोषणा झाली. मात्र, संतप्त प्रवाशांनी विमानाचे उड्डाण रोखून धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अखेर सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी या विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण केले. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते विमान पश्चिम बंगालमधील अंदल येथील काझी नुरुल इस्लाम विमानतळावर उतरले. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या काही प्रवाशांनी या प्रकरणाची नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) तक्रार करून त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली. तर काही प्रवाशांनी कंपनीला या मार्गावर विमान चालवता येत नसेल तर विमाने चालवू नयेत, असा सल्ला दिला आहे.
>अमृतसर जाणाऱ्या विमानास चार तास विलंब
स्पाइसजेटच्या एसजी ६३७१ या मुंबईहून अमृतसर जाणाºया विमानाच्या उड्डाणालादेखील शुक्रवारी सुमारे ४ तास विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. विमानाच्या उड्डाणाला विलंब झाल्यानंतरही प्रवाशांना कोणत्याही प्रकारे जेवण, चहा अशा सुविधा पुरवल्या गेल्या नसल्याची तक्रार काही प्रवाशांनी टिष्ट्वटरद्वारे केली. दुपारी १२ वाजता उडणारे हे विमान प्रत्यक्षात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उडाले. प्रवाशांमधून यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.