लँडिंगला होणाऱ्या विलंबामुळे कोट्यवधी रुपयांचे इंधन वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:41 AM2018-05-22T01:41:49+5:302018-05-22T01:41:49+5:30
हवाई प्रवासासाठी विमानांमध्ये वापरण्यात येणाºया जेट इंधनाचा दर सध्या मुंबईत प्रति किलो लीटरसाठी ६४ हजार ९०१ रुपये आहे.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इन्स्ट्रुमेंट लँडिंग सीस्टिम (आयएलएस)मध्ये सुधारणा करून, ही पद्धत अधिक सुरक्षित व वेगवान करण्यासाठीचे काम सध्या विमानतळावर वेगात सुरू आहे. मात्र, या कामामुळे विमान उतरवताना जुन्या पद्धतीवर अवलंबून राहावे लागत असल्याने, विमानांच्या लँडिंगला दररोज सुमारे अर्धा तास व त्यापेक्षा जास्त काळ विलंब होऊ लागला आहे. मुंबई विमानतळाच्या हवाई क्षेत्रात विमानांना घिरट्या घालाव्या लागत असल्याने (गो अराउंड करावे लागत असल्याने) व लॅँडिंगसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने, नेहमीपेक्षा जास्त इंधन वापरावे लागत आहे. या सर्वांचा परिणाम होऊन कोट्यवधी रुपयांच्या जेट इंधनाचा अपव्यय होत आहे.
हवाई प्रवासासाठी विमानांमध्ये वापरण्यात येणाºया जेट इंधनाचा दर सध्या मुंबईत प्रति किलो लीटरसाठी ६४ हजार ९०१ रुपये आहे. विमानांना नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने अधिक इंधन वापरावे लागत आहे. काही वेळा मुंबईत उतरणाºया विमानांचा मार्ग बदलून त्यांना जवळच्या विमानतळावर उतरण्याचे आदेश दिले जातात. रविवारी ओमानच्या एका विमानाला मुंबईत उतरण्यास जास्त विलंब लागणार असल्याने, हैदराबाद विमानतळावर उतरण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यानुसार मस्कतहून आलेले हे विमान मुंबईऐवजी हैदराबादला उतरले व सुमारे तीन तासांनंतर पुन्हा मुंबईत आले. या सर्व प्रकारामध्ये इंधन जास्त खर्च होत असून प्रवाशांचाही प्रवासासाठीचा वेळ वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी आहे. अद्ययावतीकरणाचे काम हे १७ मेच्या मध्यरात्रीपासून सुरू झाले असून, ते ५ जूनपर्यंत सुरूच राहणार आहे.