Join us

जनतेला सुविधांपासून वंचित ठेवण्याचा ‘हा’ प्रकार; मंत्री मंगलप्रभात लोढांचं BMC आयुक्तांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 12:31 PM

कॉर्पोरेट कंपन्यांची निवड करण्यासाठी यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करणे हे संयुक्तिक ठरणार नाही अशी नाराजी पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

मुंबई – सार्वजनिक शौचालयाच्या बाबतीत कॉर्पोरेट कंपन्यांकडून सदर प्रकारची कामे करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याचे स्वागतच आहे. परंतु त्यापूर्वी सदर प्रसाधन गृहांच्या बांधकामासाठी मागवलेली निविदा अंतिम टप्प्यात असताना स्थगित ठेवल्याने प्रत्यक्षात गरीब जनतेला या सुविधा मिळण्यात विलंब होणार आहे आणि  एकप्रकारे गरीब जनतेला त्यांच्या सेवा सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे अशी नाराजी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना तथा प्रशासक इक्बाल चहल यांना पत्र लिहून कळवली आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रात म्हटलंय की, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्यावतीने यापूर्वी हाती घेण्यात आलेल्या झोपडपट्टी वस्ती, सार्वजनिक ठिकाणच्या सामुहिक शौचालयाच्या बांधणीचे लॉट ११ अंतर्गतचे काम यशस्वीपणे पार पाडले. आता लॉट १२ अंतर्गत सुमारे १४ हजार शौचालय बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठीची  निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. परंतु सदर निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना सार्वजनिक प्रसाधन गृहांची कामे चांगल्या दर्जाची व्हावी याकरता कॉर्पोरेट कंपन्याकडून करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सदर कामासाठी मागवलेली निविदा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवत नवीन कामासाठी स्वारस्य अर्ज मागवले असल्याची माहिती मिळत आहे असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छ भारत अभियान हाती घेवून घरोघरी आणि सार्वजनिक प्रसाधन गृह उभरण्यावर भर दिला आहे. शौचालयांची उभारणी उत्तम दर्जाची होणे आवश्यक आहे, यात कोणतीही शंका नाही. त्यासाठी श्रेष्ठ दर्जाचे बांधकाम करणाऱ्या संस्था पुढे आल्यास त्यांचे स्वागतच व्हायला हवे. पण या कॉर्पोरेट कंपन्यांची निवड करण्यासाठी यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करणे हे संयुक्तिक ठरणार नाही. कारण शौचलय बांधणीला विलंब झाल्यास याचा सामान्य जनतेला नाहक त्रास होईल असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं.

दरम्यान, सदरची निविदा प्रक्रिया सुरु ठेवावी. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून नव्याने किवा अतिरिक्त सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी स्वतंत्र निविदा काढव्यात व त्यांना समावून घ्यावे. जेणेकरून एकाच वेळेला शौचालय उभारणीच्या कामाला सुरुवात होईल आणि लवकरात लवकर नागरिकांना सुविधा मिळेलं त्यामुळे सदरच्या सुचनेचा आपण विचार करावा अशी सूचना पालकमंत्री लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना केली आहे.

टॅग्स :मंगलप्रभात लोढामुंबई महानगरपालिका