उत्तरपत्रिका तपासणीला दिरंगाई; महाविद्यालयांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 10:32 AM2023-08-04T10:32:01+5:302023-08-04T10:32:16+5:30
अनेकदा वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालांना दिरंगाई होत असल्याने विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढतो. शिवाय, पुढील शैक्षणिक नियोजनातही अनेक अडथळे येतात.
मुंबई :
अनेकदा वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालांना दिरंगाई होत असल्याने विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढतो. शिवाय, पुढील शैक्षणिक नियोजनातही अनेक अडथळे येतात. परिणामी, विद्यार्थ्यांना विविध संधींना मुकावे लागते अशीही अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आता उत्तरपत्रिका तपासणीला दिरंगाई करणाऱ्या महाविद्यालयांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई विद्यापीठाने दिले आहेत.
विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत जाहीर करणे बंधनकारक असून महिनोनमहिन्यांचा लागणारा विलंब विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने निराशाजनक आहे. मुंबई विद्यापीठाने केलेल्या सूचनांनुसार, प्राध्यापकांनी सुटीच्या दिवशी हजर राहून उत्तर पत्रिकांची तपासणी करावी, महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्येच्या दीडपट अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासाव्यात असेही नमूद करण्यात आले आहे.
विविध परीक्षांच्या निकालांना होणाऱ्या विलंबाचा मुद्दा अधिवेशनातही गाजला होता. मागील काही दिवसांपासून टीवायबीए, एमएमसी, एमए आणि एमएससी अभ्यासक्रमाच्या सत्र एक आणि दोनचे निकाल जाहीर होणे प्रलंबित आहे. त्यामुळे आता ठरावीक वेळेत उत्तर पत्रिका तपासणे, निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे.