जातप्रमाणपत्रे देण्यात दिरंगाई; दोन महिला अधिकारी कार्यमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 07:05 AM2021-01-10T07:05:25+5:302021-01-10T07:05:47+5:30
या कार्यालयातून जात पडताळणी प्रमाणपत्रे लवकर दिली जात नाहीत, पालक आणि विद्यार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागतात आणि त्यामुळे त्यांचे प्रवेश धोक्यात आल्याच्या तक्रारी थेट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात करण्यात आल्या होत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्रे आवश्यक असताना वांद्रे येथील जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचा भोंगळ कारभार बार्टी पुणेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी या समितीच्या कार्यालयात धडक देऊन उघडकीस आणला. या दिरंगाईबद्दल दोन महिला अधिकाºयांना गजभिये यांनी तत्काळ कार्यमुक्त केले आहे.
वांद्रे येथील कार्यालयात गुरुवारी हा प्रकार घडला. समितीच्या संशोधन अधिकारी व सदस्य सचिव सुनिता मते आणि समितीच्या उपायुक्त व नियंत्रक अधिकारी सलिमा तडवी या दोघींना गजभिये यांनी कार्यमुक्त केले. या कार्यालयात जात पडताळणी प्रमाणपत्रे देताना कार्यालयीन कार्यपद्धतीचा अवलंब केला जात नाही आणि गैरप्रकार होत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचा ठपका गजभिये यांनी कार्यमुक्तीच्या आदेशातच ठेवला आहे.
या कार्यालयातून जात पडताळणी प्रमाणपत्रे लवकर दिली जात नाहीत, पालक आणि विद्यार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागतात आणि त्यामुळे त्यांचे प्रवेश धोक्यात आल्याच्या तक्रारी थेट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत गजभिये स्वत:च गुरुवारी या कार्यालयात गेले. सुनीता मते या कार्यालयात हजर नव्हत्या. या समितीचे कामकाज अतिशय अनियमित स्वरुपाचे आहे. त्यामुळे समितीच्या कामकाजाची चौकशी केली जाईल, असे गजभिये यांनी गमे यांच्या कार्यमुक्ती आदेशात म्हटले आहे. मते यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई शहर समितीच्या संशोधन अधिकारी व सदस्य सचिव ममता शेरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.सलिमा तडवी यांचा अतिरिक्त पदभार मुंबई शहराचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त व सदस्य उमेश सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.