पालिकेच्या शिष्यवृत्तीला विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 01:26 AM2020-09-23T01:26:23+5:302020-09-23T01:26:35+5:30
प्रक्रियेचे कामकाज सुरू ; टप्प्याटप्प्याने होणार वाटप
योगेश पिंगळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुुंबई : शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी हातभार लागावा, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या वर्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातून सुमारे ३० हजारांहून अधिक अर्ज महापालिकेला प्राप्त झाले आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेला विलंब झाला असून, प्रक्रियेचे कामकाज सुरू आहे. ज्याप्रमाणे कामकाज पूर्ण होईल, त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्याबाबत महापालिका प्रशासन विचाराधीन आहे.
नवी मुंबई शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरविण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मागासवर्गीय घटकातील मुले, विधवा, घटस्फोटित महिलांची मुले, दगडखाण बांधकाम करणाऱ्या कामगारांची, प्रकल्पग्रस्त कुटुंबातील मुले, मनपा आस्थापनेवरील आणि कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची मुले या सर्व घटकांतील पहिली ते पदवी आणि त्यानंतर तांत्रिक, व्यवसाय प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेण्यापासून वंचित राहतात.
या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती आणि गुणवत्ता वाढीस मदत व्हावी, या अनुषंगाने महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ मध्ये १४ हजार ५०० अर्ज दाखल झाले होते, त्यावेळी ९ कोटी ८७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते.
गेल्या वर्षी सुमारे २८ हजार अर्ज दाखल झाले असून, १९ कोटी ३२ लाख ३२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० साली शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी ३० जानेवारी, २०२० पर्यंत मुदत देण्यात आली होती.
च्या वर्षी नियमांमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले होते. त्यामध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावे आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे.
शिष्यवृत्तीसाठी या वर्षी नवी मुंबई शहरातील एकूण अंदाजे ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अंदाजे २३ कोटी रुपयांचे वाटप करावे लागणार आहे.