चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपूल खुला होण्यास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 05:25 AM2019-11-10T05:25:10+5:302019-11-10T05:25:17+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधलेला वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते चुनाभट्टी हा उड्डाणपूल शनिवारी खुला होणार होता.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधलेला वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते चुनाभट्टी हा उड्डाणपूल शनिवारी खुला होणार होता. मात्र काही काम शिल्लक असल्याने आता ते पूर्ण झाल्यानंतर पूल खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपूल बांधून तयार आहे़ तरीही तो सत्ताधारी सुरू करायला तयार नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी गेल्या महिन्यात केला. पूल खुला करण्यास टाळाटाळ केल्यास आम्ही जनतेसाठी तो खुला करू, असा इशाराही दिला. त्यानंतर एमएमआरडीएने पुलाची उर्वरित कामे पूर्ण करत शनिवारी ९ नोव्हेंबरला तो खुला करण्याचे जाहीर केले, मात्र मलिक ८ नोव्हेंबरच्या रात्री पुलाची पाहणी करण्यास गेले. काही कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्याने काम पूर्ण करूनच पूल वाहनांसाठी सुरू करावा, असे त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार आता शिल्लक काम पूर्ण करून दोन दिवसांनंतर पूल खुला करू, असे एमएमआरडीएने सांगितले.
या चारपदरी उड्डाणपुलामुळे पूर्व उपनगरातून येणाºया प्रवाशांना बीकेसीत पोहोचण्यास लागणाºया वेळेत तीस मिनिटांची बचत होईल. धारावी ते कलानगर जंक्शनदरम्यान वाहतूककोंडी सुटेल. वाहनधारकांना ठाणे, नाशिक, पनवेल-पुण्याच्या दिशेने जलद प्रवास करता येईल.