Join us

‘कान्होजी आंग्रे’ बेट पर्यटकांसाठी खुले करण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:06 AM

पोर्ट ट्रस्टकडून पर्यटनदृष्ट्या विकास; कोरोनामुळे उद्घाटन सोहळा लांबणीवरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईला लाभलेल्या सागरी क्षेत्रात पर्यटन सुविधा ...

पोर्ट ट्रस्टकडून पर्यटनदृष्ट्या विकास; कोरोनामुळे उद्घाटन सोहळा लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईला लाभलेल्या सागरी क्षेत्रात पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कान्होजी आंग्रे बेटाचा (खांदेरी) कायापालट करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये हे बेट पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन सोहळा लांबणीवर पडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कान्होजी आंग्रे बेटावरील नव्या सुविधांचे उद्घाटन करण्याचा पोर्ट ट्रस्टचा मानस होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी केंद्रातील वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार होते. परंतु, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

गेटवे ऑफ इंडियापासून अवघ्या २३ किमी अंतरावर असलेल्या कान्होजी आंग्रे बेटाचा वापर सध्या दीपस्तंभ म्हणून केला जातो. या बेटावर पर्यटन सुविधा निर्माण केल्यास मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी भर समुद्रात एक नवे पर्यटन स्थळ उपलब्ध होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय नौकानयन मंत्रालय आणि जलवाहतूक मंत्रालयाने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मदतीने तेथे मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली आहेत. डोमॅस्टिक क्रूझ टर्मिनलवरून खांदेरीपर्यंत जलटॅक्सी सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी जलमार्गाची चाचपणीही करण्यात आली.

दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उद्घाटनाची तारीख निश्चित झालेली नव्हती. त्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलला असे म्हणता येणार नाही. या कार्यक्रमासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले आहे. त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.

* तात्पुरत्या सुविधांची हाेणार निर्मिती

किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) कायद्यानुसार भरती क्षेत्राच्या ५०० मीटर आत नवीन बांधकाम करता येत नाही. त्यामुळे सध्या येथे कोणतीही कायमस्वरूपी रचना उभी केली जाऊ शकत नाही. कान्होजी आंग्रे हे लहान बेट असल्याने बफर झोन कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तोपर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरत्या सुविधा निर्माण केल्या जातील. येथे पर्यटन सुविधा पुरवणाऱ्यांची यादी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टमधील एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

....................