Join us

प.रे.ची दिरंगाई, तर म.रे.ची आघाडी

By admin | Published: October 28, 2015 12:14 AM

चर्चगेट स्थानकात लोकल बफरला आदळून झालेल्या अपघातानंतर पश्चिम रेल्वेकडून रेल्वे टर्मिनसवरील (अंतिम स्थानक) वेगमर्यादेवर नियंत्रण आणले

मुंबई : चर्चगेट स्थानकात लोकल बफरला आदळून झालेल्या अपघातानंतर पश्चिम रेल्वेकडून रेल्वे टर्मिनसवरील (अंतिम स्थानक) वेगमर्यादेवर नियंत्रण आणले जाणार होते. यासाठी एडब्ल्यूएस (आॅक्झिलरी वॉर्निंग सिस्टीम) यंत्रणा उपनगरीय लोकलच्या अंतिम स्थानकात बसवण्यात येणार होती. परंतु पश्चिम रेल्वेकडून त्याची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई होत असून मध्य रेल्वेकडून मात्र ही यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. २८ जून २0१५ रोजी सकाळी ११.२0 च्या सुमारास चर्चगेट स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर भार्इंदरहून आलेली जलद लोकल बफरला आदळून, प्लॅटफॉर्म पार करून तब्बल दहा ते पंधरा फूट वर उडाली. त्या वेळी लोकलचा वेग ताशी ४0 किमी होता. अंतिम स्थानक असलेल्या चर्चगेट स्थानकात लोकल येताच वेग ताशी ४0पेक्षा कमी असणे आवश्यक होते. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या अंतिम स्थानकात लोकलसाठी वेगमर्यादा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यात टर्मिनसवर लोकल येताच त्याच्या वेगावर आपोआप नियंत्रण येईल, अशी यंत्रणा टर्मिनसवर बसवण्यात येणार होती. यंत्रणेनुसार ताशी ४0 किंवा ५0 किमीपेक्षा जास्त वेग असलेली लोकल टर्मिनसमध्ये प्रवेश करताच ही नवी यंत्रणा त्याच्या वेगावर आपोआप नियंत्रण आणेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे जीवित आणि वित्तहानी टळेल, अशी आशा रेल्वेकडून व्यक्त करण्यात आली. मध्य रेल्वेकडून या यंत्रणेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली. सीएसटी, ठाणे, कल्याण, कर्जत, पनवेल या अंतिम स्थानकात वेगावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा एक महिन्यापूर्वीच बसवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. पण ज्या मार्गावर लोकलच्या मोठ्या अपघाताची घटना घडली, अशा पश्चिम रेल्वेकडून मात्र यंत्रणा बसवण्यात दिरंगाई करण्यात आल्याचे समोर आले.