Join us  

आरटीओ अधिकाऱ्यांच्या रुजू होण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावरील १८० अधिकाऱ्यांच्या ऑगस्टमध्ये बदल्या झाल्या आहेत. पण, अनेक अधिकारी अद्याप नव्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. मुंबईतील महत्त्वाच्या आरटीओत हीच अवस्था असून बुधवारी अंधेरी आरटीओत लायसन्ससाठी लांबचलांब रांगा लागल्या होत्या. रांगा लागल्याने शारीरिक अंतर नियमाचाही फज्जा उडाला. सध्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरटीओतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही प्रचंड ताण येत आहे.

मुंबईतील ताडदेव, अंधेरी या कार्यालयांत गेल्या दोन वर्षांपासून आरटीओ अधिकारीच नाहीत. त्याव्यतिरिक्त अंधेरी कार्यालयात एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि दोन साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीही नाही. तर ताडदेव आणि वडाळा कार्यालयातही दोन साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. याशिवाय, बोरिवली आणि पनवेल कार्यालयांचीही तीच अवस्था असून मुंबईसह महानगरातील कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्याही बऱ्याच जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे कामांचा बोजवाराच उडत आहे.

लायसन्स, परवानेवाटप यावर नियंत्रण ठेवणे, नवीन वाहननोंदणी, वाहनतपासणी योग्यता प्रमाणपत्र इत्यादी कामांची जबाबदारी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर (आरटीओ अधिकारी) असते. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ही पदे असतात. राज्यात ५० प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. यातील १६ ठिकाणीच प्रादेशिक परिवहन अधिकारी नियुक्त आहेत, तर उर्वरित आरटीओ कार्यालयांमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवरच जबाबदारी असते.