आईला कोरोना, लहान मुलगा घाबरला...लॅबने तब्बल 30 तास स्वॅबच नव्हता तपासला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 06:14 AM2020-07-28T06:14:28+5:302020-07-28T06:15:07+5:30

पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट तपासणी केलेल्या मेट्रोपोलीस लॅबने नव्हे तर मुंबई महापालिकेने आम्हाला कळवला. त्यामुळे पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यापासून ते मेडिक्लेमसाठी अर्ज सादर करण्यापर्यंत अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागला.

Delay in reporting corona test; father in tension | आईला कोरोना, लहान मुलगा घाबरला...लॅबने तब्बल 30 तास स्वॅबच नव्हता तपासला!

आईला कोरोना, लहान मुलगा घाबरला...लॅबने तब्बल 30 तास स्वॅबच नव्हता तपासला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विघ्नेश बापट (नाव बदलले आहे) यांनी स्वत:सह आई आणि आठ वर्षांच्या मुलाची चाचणी केली. विघ्नेश आणि त्यांच्या आईचा रिपोर्ट निर्धारित वेळेत मिळाला. मात्र, मुलाचा रिपोर्ट आणखी दोन दिवसांनंतर मिळेल, असे उत्तर आल्याने बापट यांचा जीव टांगणीला लागला होता. थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत पाठपुरावा केला. त्यानंतर रविवारी रात्रीच त्यांच्या हाती रिपोर्ट पडला. मात्र, या सर्व प्रकरणात लॅबच्या पोरखेळामुळे प्रचंड मनस्ताप सोसावा लागल्याची प्रतिक्रिया बापट यांनी दिली.
पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट तपासणी केलेल्या मेट्रोपोलीस लॅबने नव्हे तर मुंबई महापालिकेने आम्हाला कळवला. त्यामुळे पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यापासून ते मेडिक्लेमसाठी अर्ज सादर करण्यापर्यंत अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागल्याचे ते म्हणाले. शनिवारी सकाळी वांद्रे येथील एसआरएल लॅबच्या कर्मचाऱ्याने बापट, त्यांची आई आणि मुलाच्या चाचणीसाठी नमुने घेतले. सरकारी आदेशानुसार २४ तासांत रिपोर्ट मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार बापट आणि त्यांच्या आईचा रिपोर्ट मिळाला. तो निगेटिव्ह होता. मात्र, मुलाचा रिपोर्ट न आल्याने त्यांची चिंता वाढली. अस्वस्थ झालेल्या मुलाला रडू कोसळले. त्यानंतर बापट यांनी सातत्याने लॅबच्या प्रतिनिधींशी संपर्क साधल्यानंतर पुन्हा आई आणि त्यांचाच रिपोर्ट पाठविण्यात आला.
सतत फोन केल्यानंतरही बघून सांगतो, दुसºया बॅचमध्ये टेस्ट रिपोर्ट येईल अशी उत्तरे दिली जात होती. त्यानंतर मुलाचा रिपोर्ट आता मंगळवारी संध्याकाळीच मिळेल असे सांगण्यात आले. बापट यांचा संयम सुटल्याने तक्रारीसाठी त्यांनी पालिकेच्या कोविड हेल्पलाइनवर फोन केला. मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच फोन करून बापट यांनी गाºहाणे मांडले.
टोपे यांच्या स्वीय साहाय्यकाने ती तक्रार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना पाठवली. त्यानंतर अचानक रविवारी रात्री ९.३० वाजता लॅबने फोनवर रिपोर्ट पाठवल्याचे बापट म्हणाले. सुदैवाने तो निगेटिव्ह होता. परंतु, या सर्व प्रकरणात लॅबचा बेजबाबदार कारभार प्रचंड तापदायक ठरला. मुलाच्या चिंतेने आम्ही कासावीस झालो होतो.
आपला रिपोर्ट आला नाही म्हणजे कोरोनाची बाधा झाली या विचाराने मुलगा प्रचंड घाबरला होता. त्या वेळी आम्ही प्रचंड तणावाखाली होतो. परंतु, लॅबच्या कर्मचाऱ्यांना त्याचे सोयरसुतक नव्हते. अशा अत्यंत बेजबाबदारपणे काम करणाºया लॅबवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी बापट
यांनी केली.

गैरसमजातून घडले
एसआरएल लॅबच्या प्रतिनिधी तृप्ती शिर्के यांच्याशी संपर्क साधला असता हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. बापट यांना झालेला त्रास आपण समजू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title: Delay in reporting corona test; father in tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.