कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या परतीला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:07 AM2021-09-24T04:07:38+5:302021-09-24T04:07:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांत कोसळणारा मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. हवामान ...

Delay in return of monsoon due to low pressure area | कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या परतीला विलंब

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या परतीला विलंब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांत कोसळणारा मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशालगत असून, याचा प्रभाव ओसरला की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान मान्सून परतीचा प्रवास राजस्थानच्या पश्चिम भागातून सुरू करेल.

वेगरीस ऑफ द वेदरकडील माहितीनुसार, राजस्थानच्या पश्चिम भागातून २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास विलंबाने सुरू होत आहे. एव्हाना १७ सप्टेंबरच्या आसपास मान्सून परतीचा प्रवास राजस्थानच्या पश्चिम भागातून सुरू करणार होता. मात्र आता कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परतीच्या प्रवासाला दहा ते बारा दिवसांचा विलंब होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र दोन दिवसांत ओडिशालगत दाखल होईल. त्यामुळे राज्यासह बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रावर या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढील दोन दिवसांनंतर सुरू होईल. ३० सप्टेंबरच्या आसपास राजस्थानातून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून १० ऑक्टोबरच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होईल. तर मुंबईत १२ ऑक्टोबरच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे. परिणामी, मुंबईतल्या पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Delay in return of monsoon due to low pressure area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.