नायर रुग्णालयात उपचारास दिरंगाई; दोन डॉक्टर, एक नर्स निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 09:33 PM2021-12-02T21:33:33+5:302021-12-02T21:35:18+5:30
Nair Hospital : वरळी येथील बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटातील चार जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नायर रुग्णालय आणि पालिका प्रशासनावर टीकास्त्र उठले.
मुंबई - वरळी, बीडीडी चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या दाम्प्त्यावर नायर रुग्णालयात उपचारास दिरंगाई करण्यात आली. या दुर्घटनेत भाजलेल्या चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नायर रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका परीचारीकेला निलंबित करण्यात आले आहे. तसेच उपअधिष्ठांमार्फत सुरु असलेल्या चौकशीचा अहवाल पुढच्या आठवड्यात सादर होणार आहे. त्यानंतर त्रयस्थ समितीमार्फतही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीमधील भाजपच्या ११ सदस्यांनी गुरुवारी राजीनामे दिले.
वरळी येथील बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटातील चार जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नायर रुग्णालय आणि पालिका प्रशासनावर टीकास्त्र उठले. भाजप शिष्टमंडळाने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची भेट घेतली. त्यावेळी, याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. मृत्यू पावलेल्या बालकाच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
नायर रुग्णालयात संबंधित जखमींवर तासभर विलंबानंतर उपचार सुरु झाले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेने या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. मात्र प्राथमिक चौकशीनंतर दोन डॉक्टर आणि एक परिचारिकेला गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे. तसेच उपअधिष्ठांमार्फत सुरु असलेल्या चौकशीचा अहवाल पुढच्या आठवड्यापर्यंत प्रशासनाला सादर होणार आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर त्रयस्थ समितीमार्फतही चौकशी करण्यात येणार आहे. या समितीमध्ये पालिकेतील वरीष्ठ डॉक्टरांसह खासगी क्षेत्रातील डॉक्टरांचाही समावेश असणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
भाजपच्या ११ सदस्यांचे राजीनामे...
भाजपच्या शिस्टमंडळाने दोषी डॉक्टरांवर आग्रीपाडा पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली आहे. तसेच पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीतील भाजपच्या ११ सदस्यांनी गुरुवारी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले. पालिका पेंग्विनसाठी दररोज दीड लाख रुपये खर्च करीत असताना शिवसेनेस बालकाच्या मृत्यूचे सोयरसुतक नसल्याची टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.