कलिना कॅम्पसचा विकास लांबणीवर; प्लॅन अंतिम करण्यास दिरंगाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 10:57 AM2024-03-29T10:57:41+5:302024-03-29T10:58:31+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई विद्यापीठाचा बृहत आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करून त्याचा मसुदा विद्यापीठाला सादर केला आहे.
मुंबई :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई विद्यापीठाचा बृहत आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करून त्याचा मसुदा विद्यापीठाला सादर केला आहे. मात्र, विद्यापीठाकडून हा आराखडा अंतिम करण्यात दिरंगाई केली जात आहे. या आराखड्यावर विद्यापीठाकडून अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची स्थिती आहे.
आता विद्यापीठाकडून पुन्हा एकदा नव्याने माहिती एमएमआरडीएला सादर केली जाणार आहे. त्यामुळे बृहत आराखडा प्रत्यक्षात येऊन विद्यापीठाचा विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसचा भविष्यकालीन विचार करून विकास साधण्यासाठी त्याचा बृहत आराखडा बनविला जाणार आहे. भविष्यकालीन गरजांनुरूप विविध सेवासुविधा निर्माण करण्याचे आणि विद्यापीठाचा आधुनिक पद्धतीने विकास साधण्यासाठी हा आराखडा महत्त्वपूर्ण आहे. तसेच विद्यापीठाच्या कॅम्पसचे सौंदर्गीकरण, इमारतींचा विकास तेथील आणि विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षण पद्धतीनुसार विविध शैक्षणिक सोयीसुविधा यातून विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाचा बृहत आराखडा बनविण्याची जबाबदारी एमएमआरडीएला सोपवली होती.
१) मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या सुमारे २४३ एकर क्षेत्रफळाचा विकास साधण्यासाठी एमएमआरडीएला बृहत आराखडा बनवून द्यावा लागणार आहे.
२) सध्या विद्यापीठात अनेक शैक्षणिक सोयीसुविधांची कमतरता आहे. विद्यापीठाकडून बृहत आराखड्यावर निर्णय घेण्यास विलंब होत आहे. त्यातून विद्यापीठाच्या कॅम्पसचा विकास रखडला आहे. विद्यापीठ प्रशासनाने आता अधिक दिरंगाई न करता आराखडा अंतिम करून विद्यापीठाच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा.-संजय वैराळ, माजी सिनेट सदस्य
अहवाल देऊन बराच काळ लोटला -
विद्यापीठाकडून अद्याप या आराखड्यावर प्रत्यक्षात कार्यवाही झाली नसल्याची स्थिती आहे. अहवाल सादर होऊन बराच काळ लोटला आहे. त्यामुळे विद्यापीठाने आता विद्यापीठातील विविध विभागांकडून नव्याने माहिती मागवली आहे. ही माहिती पुन्हा एमएमआरडीएला सादर केली जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर सुधारित आराखडा एमएमआरडीएकडून मिळणार आहे. दरम्यान, विद्यापीठाकडून होणाऱ्या विलंबामुळे विद्यापीठाचा विकास लांबणीवर पडला आहे.
या कामासाठी एमएमआरडीएने ऑगस्ट २, २०१९ मध्ये डी. डी. एफ. कन्सल्टंट या सल्लागाराला कार्यादेश दिला होता. एमएमआरडीएने हा आराखडा विद्यापीठाला सादर केला आहे.