नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सडलेल्या बटाट्यांचे ढीग चार दिवसांपासून लिलावगृहात पडले आहेत. प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली असून व्यापारी व कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाजार समितीमध्ये गुजरात, उत्तरप्रदेश व इतर ठिकाणावरून विक्रीसाठी आलेला २५ टन पेक्षा जास्त बटाटा मागील आठवड्यात सडला आहे. यामधील काही गोणी लिलावगृहात ठेवण्यात आल्या आहेत. बाजार समितीच्या स्वच्छता विभागाने या गोणी उचलल्या नसल्यामुळे त्यामधून पाणी येवू लागले आहे. पूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मार्केटमध्ये माशा घोंगावू लागल्या आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या व्यापारी व कामगारांना नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे. स्वच्छता विभागाच्या कामचुकार धोरणामुळे कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्व सडलेला बटाटा तत्काळ उचलण्यात यावा अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
सडलेले बटाटे उचलण्यास दिरंगाई
By admin | Published: April 06, 2015 4:57 AM