सरकार आणि रेल्वेमधील असमन्वयामुळे रेल्वे सुरू होण्यास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:07 AM2021-07-31T04:07:22+5:302021-07-31T04:07:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना लोकल सेवा सुरू करण्यासाठी सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. केवळ चर्चा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना लोकल सेवा सुरू करण्यासाठी सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. केवळ चर्चा सुरू आहे. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यात नसलेल्या समन्वयामुळे रेल्वे प्रवासाला उशीर होत आहे, असा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे.
मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटीयन म्हणाले, कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी मागील दोन महिन्यांपासून केली जात आहे. मात्र, प्रशासन, सरकारच्या वतीने या मागणीची दखल घेत नाही. जर लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा दिली तर १५ लाख जणांना रेल्वे प्रवास करता येईल. मात्र, राज्य सरकार-रेल्वे यांच्यात समन्वय नसल्याने त्याचा फटका सामान्यांना बसत आहे. कोटियन पुढे म्हणाले, मागील तीन महिन्यांपासून लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रोजगाराची चिंता, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्य खर्च, घरातील दैनंदिन खर्च आणि त्यात वाढलेला प्रवासी खर्च हे सर्व सांभाळताना सर्वसामान्यांची तारेवरची कसरत होत आहे. पेट्रोलने शंभरी गाठल्याने खासगी वाहने वापरणे गैरसोयीचे झाले आहे. परिणामी, लोकल प्रवास खुला करण्याची मागणी केली जात आहे.
प्रवाशांना तिकीट किंवा पास काढून लोकलमधून प्रवास करायचा आहे. मात्र, मर्यादित घटकांनाच तिकीट दिले जाते. परिणामी, अनेक प्रवासी कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करत आहेत. यामधील अनेक प्रवाशांना तिकीट तपासनीस पकडून दंड आकारत आहेत. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. कामधंदा करायचा की घरात बसून उपासमारीने दिवस काढायचे.
- संकेत खाडे, प्रवासी