लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अश्लील चित्रफीत निर्मिती रॅकेट प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा व रायन थॉर्प यांच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधील महत्त्वपूर्ण डेटा मोठ्या प्रमाणात नष्ट (डिलिट) करण्यात आला आहे. कुंद्राच्या सांगण्यावरून त्याच्याकडील कामगारांनी हे कृत्य केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दोघांच्या लॅपटॉपमधून ४८ टीबी डेटा मिळाला आहे, त्यातून अनेक धागेदोरे मिळाले आहेत.
परदेशी बँक खात्यांत व्यवहार
कुंद्राच्या बँक खात्यातून अनेकवेळा परदेशी बँक खात्यांत झालेल्या व्यवहारासंबंधी नोंदी व ईमेल मिळाले आहेत. अश्लील चित्रफित प्रकरणात फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी कुंद्राच्या सांगण्यावरून अनेक महत्त्वपूर्ण बाबींसंबंधी डेटा नष्ट करण्यात आला. तो परत मिळवण्यासाठी सायबर एक्सपर्टची मदत घेतली जात आहे.
चौकशीवेळी शिल्पा रडली
कुंद्राची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची जुहूमधील बंगल्यात शुक्रवारी सुमारे ६ तास चौकशी करण्यात आली. त्यादरम्यान काही प्रश्नांची उत्तरे देताना ३ ते ४ वेळा तिला अश्रू रोखता आले नाहीत. अधिकाऱ्यांसमोर ती रडल्याचे सूत्रांनी सांगितले. राज कुंद्राने अशा अश्लील चित्रपटांची निर्मिती केली आहे का? असा प्रश्न यावेळी गुन्हे शाखेने शिल्पाला विचारले.
या संपूर्ण प्रकरणामुळे आपली प्रतिमा मलीन झाली आहे. बरेच ब्रँड आणि कॉन्ट्रॅक्टही आपल्या हातातून गेले आहेत, अशी खंत शिल्पाने व्यक्त केल्याचे समजते. यावेळी व्हिआन इंडस्ट्रीजमधील गुंतवणुकीबद्दल राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना समोरासमोर बसवून विचारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.