सलमान खानच्या ‘हिट ॲण्ड रन’वर आधारित गेम गूगलवरून हटवा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 09:13 AM2021-09-08T09:13:10+5:302021-09-08T09:13:35+5:30
मुंबई दिवाणी न्यायालयाचे आदेश
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणावर आधारित असलेला ऑनलाइन मोबाइल गेम ‘सेलमॉन भाई’ हा तात्पुरता गूगल प्ले स्टोअरवरून हटविण्याचे आदेश मुंबई दिवाणी न्यायालयाने गेम विकसित करणाऱ्या कंपनीला सोमवारी दिले. दिवाणी न्यायालयाचे न्या. के. एम. जयस्वाल यांनी सोमवारी हे आदेश दिले. परंतु, आदेशाची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली.
या गेमचे निर्माते पॅरोडी स्टुडिओ प्रा. लि. आणि कंपनीच्या संचालकांना सलमान खानशी संबंधित इतर कोणतेही गेम प्रसारित करणे, नव्याने
सुरू करण्यास प्रतिबंधित केले आहे. न्यायालयाने गेमच्या निर्मात्यांना हा गेम गूगल प्ले स्टोअरवरून ताबडतोब हटविण्याचे आदेश दिले आहेत. ‘गेम आणि त्यावरील चित्र पाहून प्रथमदर्शनी संबंधित गेम हा सलमान खान आणि त्याच्या हिट ॲण्ड रन प्रकरणाशी संबंधित असल्याचे स्पष्ट होते’, असे न्यायालयाने नमूद केले. सलमान खानने या गेमला कधीच संमती दिली नव्हती.
जर दावेदाराने (सलमान खान) असा गेम विकसित करण्याची परवानगी दिली नाही तर, निश्चितच त्याच्या गोपनीयतेच्या अधिकारावर गदा आणण्यात आली आहे. तसेच त्याची प्रतिमाही खराब करण्यात आली आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. कंपनीने व्यावसायिक नफा कमावण्यासाठी दावेदाराची ओळख आणि प्रसिद्धीचा वापर केला आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सलमान खानने गेल्या महिन्यात कंपनीविरुद्ध दिवाणी न्यायालयात याबाबत दावा केला. संबंधित गेममधील नाव आणि व्यंगचित्र हे आपलेच आहे. तसेच आपले चाहते आपल्याला ‘सलमान भाई’ म्हणतात आणि हेच नाव गेमला देण्यात आले आहे, असे सलमान खानने दाव्यात म्हटले आहे.
गेमच्या निर्मात्यांनी फायदा कमावण्यासाठी सलमानच्या नावाचा आणि व्यंगचित्राचा वापर केला. तेही त्याची संमती न घेता, असे सलमान खान यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने कंपनीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत दाव्यावरील पुढील सुनावणी २० सप्टेंबर रोजी ठेवली.