मुंबईच्या महापौरांना हटवा, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 03:20 AM2019-07-03T03:20:36+5:302019-07-03T03:20:53+5:30

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना बरखास्त करावे, अशी मागणी विरोधी सदस्यांनी मंगळवारी विधानसभेत ...

Delete the Mayor of Mumbai, attack the opponents' government | मुंबईच्या महापौरांना हटवा, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबईच्या महापौरांना हटवा, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

Next

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना बरखास्त करावे, अशी मागणी विरोधी सदस्यांनी मंगळवारी विधानसभेत केली. मालाड, पुणे येथील दुर्घटना, मुंबईची पावसाने उडालेली दैना यांचे पडसाद सभागृहात उमटले आणि विरोधकांनी सरकारला, विशेषत: शिवसेनेला लक्ष्य केले.

मुंबई महापालिकेचा नाकर्तेपणा पाणी तुंबण्यास व लोकांचे बळी जाण्यास कारणीभूत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी महापालिकेवर प्रशासक बसवून महापौरांना घरी पाठविण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, नसीम खान या सदस्यांनी मुंबई व पुण्यातील घटनांवरून तहकुबी सूचनेद्वारे चर्चेची मागणी केली. सरकार बेजबाबदारपणे वागत आहेत, हा निवडणुकीतील यशाचा उतमात चालू आहे, असे अजित पवार बरसले.

प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी व महापालिकेच्या नियंत्रण कक्षात गेले असून, ते आल्यावर चर्चा करू, असे संसदीय कामकाजमंत्री विनोद तावडे महणाले. मात्र विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब करण्यात आले.
२४ तासांत कोंढवा येथे १५, पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटपाशी सहा, कल्याणमध्ये तीन लोकांचा आणि मालाडमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला आहे. बांधकाम व्यावसायिकांचा बेजबाबदारपणा व अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यास जबाबदार आहे. त्यामुळे पावसात किड्यामुंग्यासारखे माणसे मरत आहेत, रेल्वे बंद आहे, मालगाडी घसरली आहे, याला केवळ पाऊस जबाबदार नाही. यापूर्वी मुंबईत असा पाऊस पडला नव्हता काय? असा सवाल पवार यांनी केला.



मीही मुंबईचा महापौर - भुजबळ
छगन भुजबळ म्हणाले, मीही मुंबईचा महापौर होतो. तेव्हा एकच आयुक्त असून काम नीट चालायचे. आता पाच-सहा सनदी अधिकारी असतात पण अडचणी वाढतच आहेत. डिझास्टर मॅनेजमेंटऐवजी संकट येणारच नाही याची काळजी घ्यायला हवी. शिवसेनेने मुंबई करून दाखवली नाही, तर मुंबई भरून दाखविली, अशी टीका राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केली.

आमदारांपेक्षा मलिष्का नशीबवान
आमदारांपेक्षा आर.जे मलिष्का नशीबवान आहे. तिने मुंबईच्या दुरवस्थेवर विडंबन गाताच आयुक्तांनी तिच्यासह फिरून कामांची माहिती दिली. आम्ही १५ वर्षांपासून महापालिकेच्या गैरकारभारावर बोलत आहोत. पण आम्हाला एकही अधिकारी एकही काम दाखवत नाही, असा चिमटा जितेंद्र आव्हाड यांनी काढला.

Web Title: Delete the Mayor of Mumbai, attack the opponents' government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.