मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र लोक माझे सांगाती हे पुस्तक चांगलेच गाजले होते. या पुस्तकाचा आता दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. ऐन पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यातच शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर, पवारांच्या या घोषणेचा महाविकास आघाडीवरही परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, शरद पवार यांच्या आत्मचरित्रातून महाविकास आघाडी आणि शिवसेनेबाबतही भूमिका मांडण्यात आली आहे. तर, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या चर्चांवरही पवारांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले.
महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी मैदानावर वज्रमुठ सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येत नाही म्हणून मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा, मुंबईला मारून टाकायचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही उद्धव यांनी केला. पण, मुंबई महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्यांचे तुकडे करू, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलं होतं. मात्र, शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात मुंबई केंद्रशासित करण्याचं कुणाच्याही मनात नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. ''मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो'', असे पवार यांनी म्हटलंय.
'मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो', असं पवार यांनी पुस्तकातील पान नंबर ४१७ वर लिहिले आहे. त्यामुळे, शिवसेनेकडून सातत्याने मुंबईचा दाखला देत भाजपला लक्ष्य केलं जातं. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याचाही आरोप करण्यात येतो. मात्र, शरद पवार यांच्या विधानामुळे आता शिवसेनेची कोंडी झाली आहे. आता, पवारांच्या या भूमिकेवर शिवसेना काय मत मांडते हे पाहावे लागणार आहे.
शिवसेनेचा वैचारिक पाया भक्कम नाही
दरम्यान, याच पुस्तकात शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादावरही पवारांनी निशाणा साधला आहे. 'महाविकास आघाडी आकाराला येताना शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववाद मारक ठरेल, अशी भीती काहींना होती. शिवसेनेच्या बाबतीत माझे मत ऐकाल तर, हा पक्ष वेळोवेळी कितीही जोरकसपणे भूमिका मांडो, त्यांचा वैचारिक पाया तितका भक्कम नाही. शिवसेनेच्या पूर्वेतिहासावर नजर टाकली तर राजकारणासाठी लागणारी लवचिकता त्यांनी वारंवार दाखविली आहे', असे पवार यांनी पुस्तकातील ३१८ नंबरच्या पानावर लिहिलं आहे. आणीबाणीमध्ये शिवसेनेने इंदिरा गांधी यांना दिलेल्या पाठिंब्याची तसेच त्यानंतरच्या निवडणुकीमध्येही त्यांना पाठिंबा देऊन विधान परिषदेतील दोन आमदारपदे मिळविल्याच्या इतिहासाचीही पवार यांनी आठवण करून दिली आहे. 'मुस्लिम व दलित विरोध हा शिवसेनेच्या भूमिकेतील एक पैलू झाला. परंतु तो दिसतो तेवढा टोकाचा नाही', असे आमचे निरीक्षण होते', असेही त्यांनी नमूद केले आहे.