कोरोनाकाळात दिल्ली-दुबई जगातील पाचव्या क्रमांकाचा व्यस्त आंतरराष्ट्रीय मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:07 AM2020-12-29T04:07:47+5:302020-12-29T04:07:47+5:30
डिसेंबरमधील हवाई प्रवास : मुंबई-दुबई मार्ग दहाव्या स्थानी लोकमत न्युज नेटवर्क मुंबई : मुंबई-दुबई आणि दिल्ली-दुबई काेराेना महामारीच्या काळातील ...
डिसेंबरमधील हवाई प्रवास : मुंबई-दुबई मार्ग दहाव्या स्थानी
लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : मुंबई-दुबई आणि दिल्ली-दुबई काेराेना महामारीच्या काळातील जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय मार्गांपैकी एक आहे. यूकेस्थित एअर कन्सल्टन्सी फर्म ओएजीनुसार, दिल्ली-दुबई हा डिसेंबर महिन्यातील पाचवा आणि मुंबई-दुबई हा दहावा सर्वात व्यस्त हवाई मार्ग ठरला.
सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय मार्ग म्हणजे दुबई-लंडन हिथ्रो (१७ लाख आसने) आणि त्यापाठोपाठ ओरलँडो-सान हुआन (१६ लाख आसने) आणि कैरो-जेद्दाह (१४ लाख) हे आहेत. दिल्ली-दुबईत ११ लाख उड्डाणे हाेतात. नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असली तरी वंदे भारत मिशनअंतर्गत उड्डाणे होत आहेत. दुसरीकडे, ख्रिसमसमध्ये देशांतर्गत उड्डाणांची संख्या अडीच लाखांहून अधिक होती. २५ मे रोजी देशातील नियोजित उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती, हेदेखील यामागील एक कारण आहे.
एका ट्रॅव्हल एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, महामारीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे प्रवासी प्रवासाची तारीख जवळ आल्यानंतरच बुकिंग करणे पसंत करू लागले आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत ५१ टक्के फेऱ्या प्रवासाच्या तारखेच्या दोन आठवड्यांच्या आत बुक करण्यात आल्या. प्रवासापूर्वी दोन आठवड्यांच्या आत बुक केलेल्या सहली एप्रिल-सप्टेंबरमध्ये सुमारे ८१ टक्क्यांपर्यंत हाेत्या. चौथ्या तिमाहीत (६७ टक्के) हे प्रमाण कमी झाले.
त्याचप्रमाणे जानेवारी-मार्च महिन्यात दिल्लीहून आलेल्या प्रवाशांनी सर्वाधिक बुक केलेली शहरे म्हणून मुंबई, बंगळुरू, गोवा, कोलकाता आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. एप्रिल-जूनच्या लॉकडाऊन महिन्यांत पाटणा प्रथम क्रमांकावर हाेते. त्यापाठोपाठ कोलकाता, श्रीनगर, रांची आणि बंगळुरू यांचा क्रमांक हाेता.
* प्रवासी मूळ शहरात परतू लागल्याचा परिणाम
देशांतर्गत हवाई प्रवास पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतर प्रवासी आपल्या मूळ शहरात परतू लागल्यामुळे प्रवासी संख्या वाढू लागल्याचे ट्रॅव्हल एजन्सीच्या आकडेवारीवरून दिसून येते. जुलै-सप्टेंबर महिन्यात दिल्लीहून प्रवास करण्यासाठी बुक केलेल्या पहिल्या पाच शहरांमध्ये मुंबई, पाटणा, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता यांचा क्रमांक हाेता. तर ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये मुंबई, गोवा, बंगळुरू, पाटणा आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे.
.................................................