Delhi Election Results : ...तरीही भाजपा केजरीवालांचा पराभव करू शकली नाही; उद्धव ठाकरेंकडून दिल्लीकरांचं अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 03:12 PM2020-02-11T15:12:00+5:302020-02-11T15:28:02+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंतचे कल पाहता आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंतचे कल पाहता आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. आप पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीतील जनतेचे अभिनंदन केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, दिल्लीतील जनतेने मन की बात नव्हे तर जन की बात आता देशात चालणार हे दाखवून दिले आहे. तसेच तथाकथीत राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाडू समोर टिकाव लागला नसल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. त्याचप्रमाणे अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करुन, स्थानिक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. मात्र तरीसुद्धा अरविंद केजरीवाल यांचा भाजपा पराभव करु शकली नसल्याची मत उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray: I congratulate Arvind Kejriwal and the people of Delhi for AAP's victory in #DelhiPolls2020. People have shown that the country will be run by 'Jan Ki Baat', not 'Mann Ki Baat'. BJP called Kejriwal a terrorist but couldn't defeat him. pic.twitter.com/ocfqSGInlM
— ANI (@ANI) February 11, 2020
दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे उभी राहिली आणि जनतेने लोकशाहीवर विश्वास कायम असल्याचे दाखवले. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा ही दिल्लीकर मतदारांनी फोडला असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसैनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी सुरु असून निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. आम आदमी पार्टीनं 60 हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पार्टी 9 जागांवर पुढे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत केजरीवाल सरकार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. काँग्रेसच्या कामगिरीत मात्र सुधारणा दिसून आलेली नाही. सध्या काँग्रेसला एकाही मतदारसंघात आघाडी नाही. त्यामुळे यंदाही काँग्रेस भोपळा फोडण्याची शक्यता कमीच आहे.