Join us

गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मराठी अस्मितेवर दिल्लीचं आक्रमण सुरु आहे- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 12:59 PM

सध्याच्या राजकारण्यांना सावरकर हे फक्त मतांसाठी हवे असल्याचा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला.

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे सरकार राज्यात आणि देशात आहे असं वारंवार बोललं जातं. पण वीर सावरकरांनी भारतरत्न द्या अशी आम्ही मागणी केली की, यांच्या तोंडाला फेस येतो, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा सावरकर यांच्यापासून प्रेरणा घेतल्याचे संजय राऊतांनी सांगितले. तसेच सध्याच्या राजकारण्यांना सावरकर हे फक्त मतांसाठी हवे असल्याचा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला.

शिंदे गटानं मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा यासाठी ठराव केला आहे. आता केंद्रातही त्यांच्या महाशक्ती सरकार आहे. मग ही महाशक्ती मराठीच्या बाबतीत हात आखडता का घेते. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मराठी भाषा, मराठी अस्मितेवर दिल्लीचं आक्रमण सुरु आहे. हे दुर्दैव असल्याचे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना मराठी अस्मितेसाठी केली असल्याचे संजय राऊतांनी सांगितले.

संजय राऊतांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपावर देखील निशाणा साधला. ओवेसी यांची पार्टीचं भाजपची बी टीम असल्याचे लोक बोलत असल्याचे राऊत म्हणाले. जिथं भाजपला जिंकायचे असते तिथं ओवेसी जात असतात. त्यामुळं त्यांनाचं राम-श्यामची जोडी म्हटलं पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली. 

टॅग्स :संजय राऊतमहाराष्ट्र सरकारभाजपा