करण जोहर कायद्याच्या कचाट्यात, होऊ शकतो पाच वर्षांचा तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 14:40 IST2018-01-24T14:36:13+5:302018-01-24T14:40:37+5:30
दिग्दर्शक-निर्माता करण जोहर आता नवीन वादात अडकण्याची शक्यता आहे.

करण जोहर कायद्याच्या कचाट्यात, होऊ शकतो पाच वर्षांचा तुरुंगवास
मुंबई - बॉलिवूडमधील दिग्दर्शक-निर्माता करण जोहर आता नवीन वादात अडकण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक- निर्माता करण जोहर आणि रोहित शेट्टी स्टार प्लस वाहिनीवरील रिअॅलिटी शो इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टारचे जज आहेत. मात्र या शोमध्ये दाखवली जाणारी कमला पसंद पान मसाल्याची जाहिरात वाहिनीच्या मालकांसह धर्मा प्रॉडक्शन, अँडमोल प्रॉडक्शन कंपनी, कमला पसंद कंपनीसाठी समस्या बनू शकते.
निर्माता दिग्दर्शक करण जोहरला पाच वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. त्याच्यावर कोटपा कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
सिगरेट अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स अॅक्ट (कोटपा) 2003 नुसार या सर्वांना दिल्लीतील आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे. करण जोहर आणि रोहित शेट्टी या शोचे जज आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच धर्मा प्रॉडक्शनचं नाव येत असल्यानं त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात कोटपा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी करणला दुसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास करणला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा होऊ शकतो.
या कार्यक्रमाशी संबंधित सगळ्यांना 'सेरोगेटेड अॅड' दाखवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. याबाबत सर्वांना 10 दिवसांत उत्तर द्यायले सांगण्यात आले आहे. अन्यथा दिल्ली आरोग्य विभागाकडून त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. शिवाय, त्यांना ही जाहिरातही बंद करावी लागेल.