‘दिल्ली-मुंबई’ महामार्ग बांधकामाची ‘द्रुतगती’ ; जून २०२५ पर्यंत उर्वरित कामे होणार पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 05:43 AM2024-07-19T05:43:26+5:302024-07-19T05:43:49+5:30
मुंबईतून रस्ते मार्गाने दिल्लीला १२ तासांत पोहोचणे शक्य होईल, असा दावा एनएचएआयकडून केला जात आहे. सध्या मुंबई - दिल्ली प्रवासासाठी २० ते २५ तासांचा कालावधी लागतो.
मुंबई :मुंबई - दिल्ली प्रवास वेगवान करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या द्रुतगती महामार्गाचे राज्यातील रस्त्याचे ५५ टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. पुढील वर्षभरात उर्वरित कामे पूर्ण करून मोरबेपर्यंतचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) केले आहे.
देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांना जोडण्यासाठी दिल्ली - मुंबई महामार्गाची उभारणी एनएचएआयकडून केली जात आहे. सुमारे १,३८६ किमी लांबीच्या या महामार्गापैकी महाराष्ट्रातून १७४ किमी लांबीचा मार्ग जाणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते दिल्ली असा थेट विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे. तसेच हा प्रवास जलद होणार असून, मुंबईतून रस्ते मार्गाने दिल्लीला १२ तासांत पोहोचणे शक्य होईल, असा दावा एनएचएआयकडून केला जात आहे. सध्या मुंबई - दिल्ली प्रवासासाठी २० ते २५ तासांचा कालावधी लागतो.
दरम्यान, या महामार्गाच्या राज्यातील मार्गापैकी १५६ किमी लांबीच्या रस्त्याचे काम एनएचएआयकडून सुरू आहे. तर एमएसआरडीसीकडून उभारण्यात येणाऱ्या विरार - अलिबाग बहुउद्देशीय मार्गाबरोबर उर्वरित १८ किमी लांबीच्या मार्गाची उभारणी केली जाणार आहे. एनएचएआयकडून दिल्ली - मुंबई महामार्गाचे राज्यात तलासरी ते मोरबे दरम्यानच्या १५६ किमी लांबीच्या रस्त्याचे काम सुरू आहे.
माथेरानमध्ये दुहेरी बोगदा
शेवटच्या टप्प्यातील भोज ते मोरबेदरम्यानच्या मार्गात माथेरान डोंगराखालून ४.१६ किमी लांबीचा दुहेरी बोगदा खणला जात आहे. प्रत्येकी ४ मार्गिकांचा हा बोगदा असेल. सद्य:स्थितीत या बोगद्याचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्रातील पॅकेजनिहाय कामाची प्रगती
तलासरी ते गंजाळ टप्पा २६.४ किमी ८० टक्के काम पूर्ण
गंजाळ ते म्हसवण २६.३ किमी ५० टक्के काम पूर्ण
मासवण ते शिरसाट २६.१० किमी ६० टक्के काम पूर्ण
शिरसाट ते अकलोली १७.२ किमी ४० टक्के
अकलोली ते वडपे १८ किमी ५० टक्के
आमने ते भोज २४.६ किमी ६० टक्के
भोज ते मोरबे ४.१६ किमी ४० टक्के