Join us

दिल्ली पोलिसांनो, मुंबई पोलिसांकडून जरा शिका; मुंबईकरांचा पोलिसांना कडक सॅल्यूट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 12:09 PM

मुंबई पोलिसांच्या कामगिरीचं सोशल मीडियावर तोंडभरुन कौतुक

मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी संध्याकाळी हल्ला झाला. माक्स घालून आलेल्या काही जणांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. मात्र अद्याप या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. विशेष म्हणजे विद्यापीठात हिंसाचार करणारे तरुण पोलिसांच्या बाजूनं निघून गेले. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं नाही, असे आरोपदेखील झाले. तसे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे दिल्ली पोलिसांबद्दल सोशल मीडियातून रोष व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे अतिशय संयमानं आंदोलनं हाताळणाऱ्या मुंबई पोलिसांचं तोंडभरुन कौतुक सुरू आहे.  रविवारी संध्याकाळी जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. या घटनेच्या निषेधार्थ काही विद्यार्थ्यांनी गेटवे ऑफ इंडियाजवळ आंदोलन सुरू केलं. जेएनयूमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या या आंदोलनात तापसी पन्नू, स्वरा भास्कर, श्वेता त्रिपाठी, अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी सहभाग नोंदवला. या आंदोलनाचा फटका काही प्रमाणात सर्वसामान्य जनता आणि पर्यटकांना बसत होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना इतरत्र जाण्याची विनंती केली. मात्र त्यांनी नकार दिला. आंदोलकांनी गेटवे ऑफ इंडियाचा परिसर सोडण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी थोडी घोषणाबाजी झाली. पोलिसांच्या गाड्यांमधून थोड्याच वेळात सर्व आंदोलकांना आझाद मैदानात आणण्यात आलं. आंदोलकांनी आझाद मैदानात काही वेळ आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. या सर्व घटनाक्रमात पोलिसांनी परिस्थिती अतिशय शांतपणे हाताळली. आंदोलकांना स्थलांतरित करताना कोणताही वाद होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून धडे घ्यायला हवेत, असा सल्लादेखील अनेकांनी दिला आहे. 

टॅग्स :जेएनयूमुंबई पोलीस