मुंबई : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या एनसीबीच्या मुंबई पथकातील सहा वादग्रस्त गुन्ह्याच्या तपास आता दिल्लीच्या विशेष तपास पथकाकडे सोपविण्यात आला आहे. क्रुझ प्रकरणात आर्यन खानवरील कारवाई, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे जावई या दोन प्रमुख गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तपासासाठी उपमहासंचालक संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली पथक शनिवारी मुंबईत दाखल झाले.
विशेष पथकाकडे सोपविलेली सहाही प्रकरणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असल्याने महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण तपास तटस्थ व निष्पक्षपणे केला जाईल, असे एनसीबीचे उपमहासंचालक (अभियान) संजय कुमार सिंग यांनी जाहीर केले. मात्र, पंच प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्रासह समीर वानखेडे यांच्यावर केलेले गंभीर आरोप आणि अन्य वादग्रस्त बाबीमुळे ढासळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, समीर वानखेडे यांनी आपण विभागीय संचालक असून एसआयटीकडील तपासात मुंबईच्या पथकाचाही समावेश असल्याचा दावा केला आहे.
प्रभाकर साईलच्या आरोपांचा परिणाम
साईल याच्या आरोपावरून दिल्लीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली ५ जणांच्या पथकाने गेल्या आठवड्यात वरिष्ठांकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार महासंचालक एस. बी. प्रधान यांनी आर्यन खान प्रकरणासह मुंबई एनसीबीकडील ६ गुन्हे दिल्लीच्या एसआयटीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. तपासाची कक्षा वाढवल्याने वानखेडे यांचे अधिकारी एसआयटीकडे वर्ग झाले आहेत.