लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मुंबईतील पहिल्या पूर्णतः भूमिगत असलेल्या मेट्रो मार्ग- ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ)च्या संचलन आणि देखभालीचे कंत्राट दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएमआरसी)ला दिले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेनंतर हे कंत्राट त्यांना देण्यात आले. ‘डीएमआरसी’ने सर्वांत कमी बोली लावून हे कंत्राट मिळविले. त्यामुळे मुंबईच्या मेट्रोला जणू दिल्लीच चावी देणार असल्याचे उघड झाले आहे.
मेट्रो- ३ मार्गाच्या कार्यान्वयनासाठी संचलन आणि देखभालीसाठी हा करार एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतातील मेट्रो रेल्वे क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या ‘डीएमआरसी’ने दोन दशकांहून अधिक काळ दिल्ली मेट्रोअंतर्गत विविध मेट्रो मार्गांचे यशस्वी संचलन व देखभाल केली आहे.
या कराराचा कालावधी दहा वर्षे असून, याअंतर्गत डीएमआरसी मेट्रो- ३ च्या दैनंदिन संचलन व देखभालीसाठी जबाबदार असेल. याशिवाय संचलन नियंत्रण केंद्रे, डेपो नियंत्रण केंद्र व स्थानके यांचे व्यवस्थापन, तसेच सर्व गाड्या व मेट्रो प्रणालीच्या सर्व पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करणे याचीही जबाबदारी डीएमआरसीकडे असेल.
प्राधिकरण म्हणून कर्तव्य
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मेट्रो रेल्वे प्राधिकरण म्हणून कर्तव्य पार पाडेल; तसेच महसूल व्यवस्थापन, मल्टिमॉडल इंटिग्रेशन, व्यवसाय व ब्रँड व्यवस्थापन, जनसंपर्क, कायदेविषयक बाबी, सेवा कर्ज, देयके आणि नियामक मंडळांशी समन्वय यासाठी जबाबदार असेल.
मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे संचलन आणि देखभाल करण्यासाठी निवडण्यात आलेली डीएमआरसी ही देशातील अग्रगण्य मेट्रो ऑपरेटिंग कंपन्यांपैकी एक आहे. डीएमआरसीसारख्या कंपनीसोबत काम करणे आनंदाची बाब आहे. कोणत्याही मेट्रोसाठी संचलन आणि देखरेख हा महत्त्वाचा घटक असतो. आम्ही प्रवाशांना परवडणाऱ्या दरात, आरामदायक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उच्च दर्जाची सेवा देण्यास कटिबद्ध आहोत.- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन