नारायण जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जगातील सर्वांत लांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि दिल्ली ते जेएनपीटी बंदरास जोडणाऱ्या १३५० किमीच्या मार्गावर माथेरानच्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या डोंंगररांगाखालून ४.३९ किमीचा आठ पदरी बोगदा लवकरच खोदला जाणार आहे. पर्यावरण खात्याची परवानगी मिळाल्यानंंतर त्याच्या बांधकामाचे कंत्राट नॅशनल हायवे ॲथॉरिटीने शुक्रवारी इरकॉन कंपनीस दिले. या बोगद्यांवर १ हजार ४५३ कोटींचा खर्च होणार आहे. यामुळे दिल्ली-मुंबई रस्त्याचे अंतर २४ तासांंवरून १२ तासांवर येणार आहे.
ॲथॉरिटीतील सूत्रांंनुसार रायगड जिल्ह्याच्या पनवेलजवळ माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या मोरबे गावापासून हा बोगदा सुरू होणार असून तो ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथनजीकच्या भोज गावापर्यंत असेल. या मार्गात महाराष्ट्रातील सर्वांत मोठा अडथळा २१४.७३ चौरस किमीच्या माथेरान इको-सेन्सिटिव्ह झोनचा होता. पर्यावरणीयदृष्ट्या या संंवेदनशील क्षेत्रातून मार्ग आणि बोगदा बांधण्याचे मोठे आव्हान नॅशनल हायवे ॲथॉरिटीसमोर होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंंत्री नितीन गडकरी यांंनी प्रतिष्ठेचा केलेल्या या मार्गावरील सर्व परवानग्या मिळाल्यानंंतर ४.३० किमी लांबीच्या बोगद्यासाठी मे महिन्यात निविदा मागविल्या होत्या. त्यात देश-विदेशांतील १८ मोठ्या कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यातील कमी दराची निविदा भरलेल्या पाच प्रमुख कंंत्राटदारांपैकी १०.९ टक्के कमी दराची निविदा भरणाऱ्या इरकॉन कंपनीस हे काम दिले आणि येत्या अडीच वर्षांत ते पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
आता आव्हान भूसंपादनाचे
परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे मोठे आव्हान असेल. शेतकऱ्यांचा भूसंपादनास विरोध आहे.
असा आहे महामार्ग
- दिल्ली ते उरणच्या जेएनपीटी बंदरास जोडणारा हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे आठ पदरी असून, त्यावर एक लाख कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
- हा मार्ग सवाई माधोपूर, कोटा, रतलाम, बडोदा आणि सुरत, ठाणे, नवी मुंबई या शहरांना जोडणार आहे.
- तो दिल्लीतून ९ किमी, हरियाणा १२९ किमी, राजस्थान २७३ किमी, मध्य प्रदेश २४४ किमी, गुजरात ४२६ आणि महाराष्ट्रात १७१ किमी असेल.
- या एक्स्प्रेस-वेची मुख्य लांबी सोहना ते विरार दरम्यान ११८९ किमी आहे. या व्यतिरिक्त त्याला दोन जोडरस्ते आहेत.
- फरिदाबाद ५९ किमी आणि विरार-जेएनपीटी ९१ किमी असे ते रस्ते असतील.