'संगीत माऊली' नाटकाला दिल्लीचे निमंत्रण; एनएसडी भारंगममध्ये दाखवले जाणार मुंबई मराठी साहित्य संघाचे नाटक
By संजय घावरे | Published: January 19, 2024 04:50 PM2024-01-19T16:50:23+5:302024-01-19T16:50:42+5:30
'संगीत माऊली' हे नाटक दिल्लीतील एनएसडी भारंगममध्ये दाखवले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - आजवर विविधांगी नाटक आणि चित्रपटांमध्ये नाना प्रकारच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेते प्रमोद पवार यांनी दिग्दर्शित केलेले 'संगीत माऊली' हे नाटक सध्या प्रकाशझोतात आहे. मुंबई मराठी साहित्य संघाची निर्मिती असलेल्या या नाटकाला थेट दिल्लीहून आमंत्रण आले आहे.
'संगीत माऊली' हे नाटक दिल्लीतील एनएसडी भारंगममध्ये दाखवले जाणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपानदेव यांचे माता-पिता विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या जीवन प्रवासावर हे नाटक बेतलेले आहे. सुमधुर संगीत आणि उत्तम अभिनय यामुळे रसिकांच्या मनाचा हे नाटक ठाव घेते. १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील श्रीराम सेंटरमध्ये सायंकाळी ६ वाजता 'संगीत माऊली' नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. दिल्लीतील मराठी मंडळी, खासदार, सनदी अधिकारी खास निमंत्रित आहेत.
प्रमोद पवारांच्या दिग्दर्शनाखाली रंगभूमीवर अवतरलेल्या या नाटकाचे लेखन प्रदिप ओक यांनी केले आहे. या नाटकाचे संगीत दिग्दर्शन डॉ. राम पंडित यांनी केले असून, सुधीर ठाकूर यांनी नेपथ्य, तर श्याम चव्हाण यांनी प्रकाश योजना केली आहे. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या साहिल विशे, तन्वी गोरे, श्रेयस व्यास, डॉ. गौरी पंडित अशी नव्या दमाची मंडळी 'संगीत माऊली'मध्ये अभिनय करीत आहेत. नुकताच डॉ. गौरी पंडित हिला दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा उदयोन्मुख संगीत नाट्य कलाकार पुरस्कार मिळाला आहे. साहिल इंजिनिअरिंग तर श्रेयस कला शाखेत शिक्षण घेत आहेत. तन्वी शास्त्रीय गायन, कथकमधेही पारंगत आहे. यांच्या जोडीला कविता विभावरी, आनंद पालव, मनोज नटे, सचिन नवरे आहेत.