मुंबईत मतदानासाठी जाणीवपूर्वक विलंब; निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा; उद्धव ठाकरे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 10:30 AM2024-05-21T10:30:10+5:302024-05-21T10:30:36+5:30

मतदारांना दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून मुद्दाम वेळ लावल्याचा दावा... ‘वेळे’वरून राजकारण...

Deliberate delay in voting in Mumbai; partisanship of the Election Commission; Uddhav Thackeray's allegation | मुंबईत मतदानासाठी जाणीवपूर्वक विलंब; निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा; उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबईत मतदानासाठी जाणीवपूर्वक विलंब; निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा; उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबई : मुंबईतील मतदार मतदानासाठी मोठ्या रांगा लावून उभा असताना मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून जाणीवपूर्वक मतदानाला विलंब करण्यात आला. भाजप पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करत आहे. निवडणूक आयोगाचा हा पक्षपातीपणा असून मतदानाला होणारा विलंब क्षमा करता येण्यासारखा नाही, असा आरोप उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केला.
मतदानासाठी विलंब लागत असल्याच्या तक्रारी उद्धवसेनेकडून करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. 

न्यायालयात दाद मागणार
- उद्धवसेनेला जेथे मतदान मिळणार आहे किंवा आघाडी मिळत आहे, अशा ठिकाणी विलंब केला जात आहे. 
- मतदारांनी जाणीवपूर्वक विलंब लावणाऱ्या निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींची नावे घेऊन त्याची माहिती जवळच्या शिवसेना शाखेत द्यावी. 
- या प्रतिनिधींची नावे आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करू. तसेच न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे नेहमीचे रडगाणे : देवेंद्र फडणवीस
मुंबईत संथगतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र नेहमीप्रमाणे उद्धव  ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरू केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे पंतप्रधान मोदींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. ४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

संथगतीने मतदानामागे षडयंत्र आहे का? : काँग्रेसचा सवाल
मुंबईतील अनेक भागांत मतदानासाठी लोक उत्साहाने पार पडले, मात्र मतदान जाणीवपूर्वक संथगतीने सुरू होते, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे. काही ठराविक मतदान केंद्रांवर जाणीवपूर्वक संथगतीने मतदान करण्याचे षडयंत्र आहे का? असा सवाल सावंत यांनी केला आहे
 

Web Title: Deliberate delay in voting in Mumbai; partisanship of the Election Commission; Uddhav Thackeray's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.