लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतात दिवाळी सणामध्ये केल्या जाणाऱ्या घरच्या खमंग फराळाची बातच निराळी. आपल्या घरापासून दूर विदेशात नोकरी, कामानिमित्त स्थायिक झालेल्या अनेकांना घरचा फराळ मिळणे दुरापास्त होते. मात्र आता विदेशात राहणाऱ्या भारतीयांपर्यंत हा फराळ पोहोचविण्यासाठी पोस्ट खात्याने सुरक्षित पॅकेजिंग आणि विशेष बुकिंग काउंटर सुरू सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मुंबईतील पोस्ट ऑफिसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. सुविधेमुळे विदेशात राहणाऱ्या मुंबईतील भारतीयांना घरचा फराळ चाखता येणार आहे. ज्या भारतीयांना भारतात येणे शक्य नाही त्यांच्यासाठी सुविधा उपयोगी आहे.
पालकांसमोर प्रश्न
मुंबईतील अनेक उच्चशिक्षित तरुण- तरुणी जगातील विविध देशांमध्ये कार्यरत आहेत. दिवाळी सणाला आपल्या मुला- मुलींपर्यंत दिवाळीचा फराळ कसा पाठवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर असतो. आता हा प्रश्न पोस्टाच्या मुंबई विभागाने सोडविला आहे. मुंबई डाक विभागात या सुविधेअंतर्गत जगभरात दिवाळी फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, आयटीपीएस या विविध आंतरराष्ट्रीय मेल सेवा उपलब्ध असून या सेवांचे दर खासगी कुरिअर कंपन्यांच्या दरापेक्षा कमी आहेत.
विविध उपकरणे
मुंबईमधील सर्व कार्यालयांत फराळाच्या बॉक्सचे पेंकिंग करण्यासाठी उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याद्वारे काही मिनिटांमध्ये फराळ आणि भेटवस्तूंचे पॅकिंग केले जाते. हे बॉक्स लगेचच परदेशात पाठविले जातात. या सेवेचा अधिकाधिक मुंबईकरांनी लाभ घेऊन दिवाळी फराळ आपल्या नातेवाइकांना पाठवावा, असे आवाहन पोस्ट खात्याने केले आहे. टपाल विभागाने गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त ७ हजार ५०० किलो फराळ परदेशात वेळेत पाठविण्याचा विक्रम केला होता.
प्रियजनांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी
ग्राहकांनी फराळाचे पदार्थ दिल्यानंतर त्याचे तत्काळ पॅकिंग करून ते परदेशात पाठविण्याची सोय पोस्टाने केली आहे. जगभरातील प्रियजनांना फराळाचे पदार्थ, भेटवस्तू पाठवून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पोस्टाचा हा उपक्रम आहे.