मुंबई : दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथे सौरऊर्जा आणि पाणीबचत करणारी व्हॅक्युम तंत्रज्ञान असणारे शौचालय बांधण्यात आले होते. त्यासाठी ९० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. हे शौचालय बांधून केवळ ७ महिने झाले असून, आता येथून दुर्गंधी येत आहे, तसेच हे शौचालय काही दिवस बंद असते़ त्यामुळे गैरसोय होत आहे, अशा तक्रारी नागरिक आणि पर्यटकांनी केल्या आहेत.
साधारणपणे शौचालयाला एका फ्लशसाठी आठ लीटर पाण्याची आवश्यकता लागते, परंतु या शौचालयात केवळ ८०० मिलीलीटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे पाणी बचत होते. तर शोचालयावरती सोलर पॅनल लावले असून, त्यामधून निर्माण होणारी वीज शौचालयासाठी वापरली जाते. व्हॅक्युम तंत्रज्ञान असलेल्या या शौचालयासाठी ९० लाख रुपये खर्च करण्यात आले असून, ते मुंबईतील सर्वात महाग शौचालय आहे. सात महिन्यांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले होते.रस्त्यापलीकडे असलेल्या मलनि:स्सारण वाहिनीशी शौचालयाची जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे शौचालयातील मल टाकीत सोडण्यात येतो, तसेच एक दिवसाआड टाकी साफ करण्यात येते. दरम्यान, हा व्हीआयपी पट्टा असून, रस्त्यापलीकडील मलनि:सारण वाहिनीशी या शौचालयाची जोडणी केल्यास येथील वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मलनि:सारण वाहिनीशी जोडणी करण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार केला जात आहे, असे एका अधिकाºयाने सांगितले.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. विशेषत: सुट्टीच्या दिवशी ही गर्दी आणखी वाढते. या बाबींचा विचार करता शौचालयाची नियमित स्वछता राखणे आवश्यक आहे, असे मरिन ड्राइव्ह सिटिझन असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय सोमाणी यांनी सांगितले. येथील स्थानिक रहिवाशी महेंद्र हेमदेव म्हणाले की, काही ठरावीक दिवशीच येथे दुर्गंधी येते. जे शौचालय वापरतात, त्यांना टोकन नंबर देण्यात आले आहेत.
या शौचालयाची निगराणी राखायला हवी. या शौचालयाबाबत तक्रारी मिळाल्या आहेत , दररोज येथे १,५०० लोक येतात. सध्या सेप्टिक टँक दिवसाआड स्वच्छ केली जाते, परंतु या शौचालयाला रस्त्यापलीकडे एअर इंडियाच्या इमारतीजवळ असणाºया मलनि:सारण वाहिनीशी जोडण्यासाठी ट्रेंचलेस तंत्रज्ञान वापण्याचा विचार करत आहोत- किरण दिघावकर, सहायक आयुक्त, ए वार्ड