पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर दुर्गंधी
By Admin | Published: July 16, 2014 12:54 AM2014-07-16T00:54:51+5:302014-07-16T00:54:51+5:30
गटारमिश्रीत पाण्याचे साचलेले तळे, इमारतीचा गळका स्लॅब, डॉक्टरांच्या रुममध्ये वड, पिंपळ इ. झाडांची वाढलेली
पालघर : गटारमिश्रीत पाण्याचे साचलेले तळे, इमारतीचा गळका स्लॅब, डॉक्टरांच्या रुममध्ये वड, पिंपळ इ. झाडांची वाढलेली खुरटी, सर्वत्र पसरलेली कागदपत्रे व जुनाट साहित्यासह कोळीष्टके अशी अत्यंत केविलवाणी व उबग आणणारी परिस्थिती पाहावयास मिळत आहे ती पालघरच्या दवाखान्यात. आणि या अत्यंत गलिच्छ वातावरणात पालघर दवाखान्यातुन गाई, म्हशी, बकरी या आजारी प्राण्यांवर उपचार केले जातात. मात्र असल्या गलिच्छ, प्रदुषीत वातावरणात उपचारासाठी आणलेल्या आपल्या प्राण्यांचा मृत्यू तर होणार नाही ना? या भितीने गरीब शेतकरी आर्थिक भुर्दंड सहन करीत खाजगी डॉक्टरांकडे जाण्यास पसंती देत आहेत.
या दवाखान्यांतर्गत पालघर नगरपालिका क्षेत्रासह सातपाटी, शिरगाव, खारेकुरण, मोरेकुरण, कोळगाव इ. गावे अंतर्भूत असून शेतकरी, बागायतदार खाजगी लोक आपल्या गायी, म्हैशी, घोडे, शेळ्या, कोंबड्यासह पाळीव कुत्रेही उपचारासाठी आणले जातात. तर बाहेरील आजारी जनावरे तपासणे सर्पदंशावर उपचार, गर्भधारणा प्राण्याची तपासणी, वंधत्व प्राणी तपासणी, मोठ्या जनावरांना लसीकरण, रक्त, शेण, मुलभूत तपासणी इ. सुविधा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिल्या जातात. तर सुशिक्षित बेरोजगार तरूणांना पशुसंवर्धनाविषयी प्रशिक्षण देऊन त्यांचे स्वयंरोजगारातुन आर्थिक स्वावलंबन साधण्याचा प्रयत्नही याच केंद्राद्वारे केला जातो. वैरण विकास योजना, गोचीड-गोमाशी निर्मूलन योजना, विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम, या योजना पशुवैद्यकीय केंद्राद्वारे राबविल्या.