Join us

१० लाख गरजूंना स्वातंत्र्यदिनी देणार पोटभर जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 2:00 AM

देशातील १० लाख गरजूंना स्वातंत्र्यदिनी पोटभर जेवू घालण्याचा उपक्रम रॉबिनहूड आर्मी या स्वयंसेवी संस्थेने हाती घेतला आहे.

मुंबई : देशातील १० लाख गरजूंना स्वातंत्र्यदिनी पोटभर जेवू घालण्याचा उपक्रम रॉबिनहूड आर्मी या स्वयंसेवी संस्थेने हाती घेतला आहे. ‘मिशन मिलियन २०१८’ या उपक्रमांतर्गत संस्थेचे १६ हजारांहून अधिक स्वयंसेवक (रॉबिन्स) देशातील ६० गावखेड्यांसह शहरांमध्ये गरजूंना जेवण पुरवण्याचे काम करणार आहेत.देशातील उपासमारीची समस्या सोडविण्यासाठी रॉबिनहूड आर्मीने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून संस्थेच्या उपक्रमाबाबत जनजागृती सुरू आहे. देशात १९ कोटी लोकांना उपाशी झोपावे लागते. या उपक्रमाच्या माध्यमातून उपासमारीच्या समस्येवर कायदा तयार करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्रित येण्याचे आवाहन केले जात आहे. संस्थेने तयार केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांनाही या उपक्रमाशी जोडले जात आहे. जेणेकरून संबंधित प्रेक्षक त्या-त्या शहरातील मान्यवरांना या प्रश्नाची जाण करून देतील. तसेच या प्रश्नावर उपाययोजना आखण्यासाठी पाठपुरावा करतील.या उपक्रमात कोणत्याही प्रकारचा निधी गोळा करत नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. ज्या नागरिकांना उपक्रमात सामील व्हायचे असेल, त्यांनी संस्थेने तयार केलेला व्हिडीओ मोठ्या संख्येने शेअर करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. त्यासोबतच स्थानिक नेत्यांना या प्रश्नाबाबत सोशल मीडियावर माहिती देऊन स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या जेवणवाटप कार्यक्रमात सामील होण्याची विनंती केली आहे.>यांना मिळणार भरपेट जेवण!अनाथाश्रम, वृद्धाश्रम, बेघर लोक आणि गरजू रुग्णांना रॉबिनहूड आर्मी मोफत जेवण देणार आहे. स्वातंत्र्यदिनी हा उपक्रम राबवून देशाला उपासमारीतूनही स्वतंत्र करण्याचा संस्थेचा ध्यास आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.>येथे होणार वाटपचर्चगेट, भायखळा, ग्रँट रोड, वरळी, परळ, माटुंगा, वडाळा, दादर, वांद्रे, चेंबूर, गोवंडी, अंधेरी, जुहू, मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली या ठिकणी जेवणाचे वाटप होणार आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली, पनवेल, वाशी, तुर्भे, सीवूड दारावे येथेही जेवण वाटले जाईल. दरम्यान, जव्हार पाड्यासह पाच आदिवासी गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह वारली कामासाठी यंत्र आणि कच्च्या मालाचे वाटपही केले जाणार आहे.