मुंबई: रुग्णालयात तपासणीसाठी येत असताना रस्त्यातच वेदना होऊ लागल्याने एक गर्भवती महिला पदपथावरच कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी बॉम्बे हॉस्पिटल परिसरात घडली. त्यावेळी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक महिला कर्मचारी या महिलेच्या मदतीला धावून आली. काही महिलांच्या मदतीने पदपथावरच या महिलेची प्रसूती झाली. मंजू राजेंद्र वीर असे या समयसूचकता दाखवणाऱ्या कर्मचारी महिलेचे नाव आहे. हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात त्या कार्यरत आहेत. सध्या नवरात्रीचे उपवास असल्याने त्या मुंबादेवी मंदिरात जाण्यासाठी टॅक्सी थांब्याकडे निघाल्या होत्या. तेव्हा हॉस्पिटलमधून तपासणी करून एक गर्भवती महिलाही टॅक्सी थांब्याकडे येत होती. अचानक या महिलेच्या पोटात वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्याने ती रस्त्यावर कोसळली आणि ओरडू लागली. महिलेची ही अवस्था पाहून मंजू वीर यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांकडे मदत मागितली. महिलांनीही आडोसा तयार करून,भर रस्त्यात तिचे सुखरूप बाळंतपण केले. त्यानंतर मंजू यांनी तत्काळ बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांना ही बाब कळवली. त्यानुसार काही कर्मचाऱ्यांनी येऊन प्रसूत झालेल्या महिलेस रुग्णालयात दाखल केले. मंजू वीर यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे आई व नवजात बालक सुखरूप असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)
बॉम्बे हॉस्पिटलजवळ पदपथावर महिलेची प्रसूती
By admin | Published: October 11, 2016 4:02 AM