मुंबई: अॅानलाईन खरेदीच्या माध्यमातून फसवणुक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच अनेक सामान्य ग्राहकांपासून नामांकित लोकांपर्यत अनेकांची फसवणुक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता युवासेनेचे प्रमुख आदित्या ठाकरे यांचीही यामध्ये भर पडल्याचे समोर आले आहे. आदित्य ठाकरेंच्या नावे 'मातोश्री'वरील कार्यकर्त्यांना फसवणाऱ्या धीरेन मोरे असं या 20 वर्षीय डिलिव्हरी बॉयचं नाव असून खेरवाडी पोलिसांनी त्याला अटक केली.
आगामी विधानसभा काही दिवसांवर असताना आदित्य ठाकरे जनआशिर्वाद यात्राद्वारे महाराष्ट्रातील विविध मतदार संघात जाऊन तेथील जनतेशी संवाद साधत आहे. मात्र आदित्य ठाकरे घरी नसल्याचा फायदा एका नामांकित कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने घेऊन चक्क आदित्य ठाकरेंच्याच नावाने गंडा घातला आहे. आदित्य ठाकरेंनी कोणतीही अॅानलाईन वस्तू खरेदी नसताना देखील त्यांच्या नावाने पार्सल डिलिव्हरी बॉय मातोश्री वर जाऊन देत होता. या पार्सल मध्ये तो कमी किंमतीच्या वस्तू पॅक करुन वस्तूंची मोठी रक्कम वसूल करत होता. तसेच आदित्य ठाकरे मातोश्रीवर उपस्थित नसल्याने ते पार्सल तेथील कार्यकर्ते किंवा पोलिसांना देऊन पैसे वसूल करायचा. आरोपीने असे ४ वेळा केल्याचे देखील उघड झाले आहे.
डिलिव्हरी बॉय धीरेनला चार वेळा फसवणुक करण्यात यश आल्यानंतर पाचव्यांदा देखील असा प्रकार करण्याची त्याने हिंमत केली. मात्र यावेळी आदित्य घरात असल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना पार्सलबाबत सांगितले. आपण काहीच मागविले नसल्याचे आदित्य यांनी स्पष्ट केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आरोपी धीरेनला खेरवाडी पोलिसांनी अटक करुन गुन्हा नोंदविला आहे.