खा. डेलकर आत्महत्या प्रकरण; सर्वांचे गुन्हे रद्द, प्रशासकांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 12:17 PM2022-09-09T12:17:01+5:302022-09-09T12:18:42+5:30
प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यासह नऊ जणांकडून मोहन डेलकर यांची छळवणूक सुरू होती. डेलकर यांना सातत्याने अपमानित केले जात असे त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार डेलकर यांचा मुलगा अभिनव यांनी पोलिसांत दाखल केली होती.
मुंबई : दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यासह नऊ जणांवर मुंबई पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. डेलकर यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मरिन ड्राइव्ह येथील एका नामांकित हॉटेलात आत्महत्या केली होती.
प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यासह नऊ जणांकडून मोहन डेलकर यांची छळवणूक सुरू होती. डेलकर यांना सातत्याने अपमानित केले जात असे त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार डेलकर यांचा मुलगा अभिनव यांनी पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर मरिन ड्राइव्ह पोलिसांनी पटेल यांच्यासह तत्कालीन पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी व अन्य सहा जणांवर डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. गुन्हा रद्द करण्यासाठी पटेल यांच्यासह नऊ जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्या. पी. बी. वराळे व एस. कुलकर्णी यांनी पटेल व अन्य आरोपींवर मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द केला. सर्व बाबींचा विचार करता आम्हाला याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादात तथ्य आणि वस्तुस्थिती आढळते. कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर रोखण्यासाठी फौजदारी दंडसंहिता कलम ४८२अंतर्गत न्यायालयाने अधिकारांचा वापर करणे योग्य आहे. अभिनव डेलकर यांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात येत आहे, असे खंडपीठाने निकालात म्हटले आहे.