मुंबई : सध्या पुण्यात करण्यात येणाऱ्या डेल्टा प्लस या विषाणूची चाचणी आता मुंबईत शक्य होणार आहे. यासाठी महापालिकेने अमेरिका येथून मागविलेली अत्याधुनिक मशीन कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून डेल्टा प्लस चाचणीला सुरुवात होणार आहे. या चाचणीचा अहवाल तीन ते चार दिवसांमध्ये मिळणार आहे.
फेब्रुवारी मध्यान्हपासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग सुरू झाला. या संसर्गाचे प्रमाण आता पूर्णपणे नियंत्रणात येत असताना कोरोनाचे बदललेले घातक स्वरूप असलेल्या डेल्टा प्लसचा धोका वाढला आहे. आतापर्यंत या आजाराचे संशयित ६०० रुग्णांचे अहवाल पालिकेला मिळाले आहेत. डेल्टाचा संसर्ग झालेला आतापर्यंत केवळ एक रुग्ण आढळला असून तो बरा झाला आहे. परंतु, खबरदारी म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणूंच्या चाचण्या करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
सध्या अशा वेगवेगळ्या विषाणूंच्या ''जिनोम सिक्वेन्स’साठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ या संस्थेकडे संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठविले जातात. मात्र या चाचण्यांचे अहवाल येण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे पालिकेने 'डेल्टा प्लस'सारख्या विषाणूंच्या चाचण्या करण्यासाठी गेल्या महिन्यात प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही मशीन आता कस्तुरबा रुग्णालयात आणण्यात आली आहे.
दोन महिने नव्हे, चार दिवसांत अहवाल
डेल्टा प्लस विषाणूची चाचणी करण्यासाठी सध्या मुंबईतील नमुने पुणे येथे पाठवावे लागत आहेत. तिथून अहवाल येण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयात 'डेल्टा प्लस' चाचण्या करण्याची तयारी सुरू केली. यासाठी अमेरिकेहून साडेसहा कोटींचे अत्याधुनिक मशीन आणण्यात आले आहे.