दिलासा! मुंबईतील डेल्टा प्लस विषाणूचे दाेन्ही रुग्ण झाले कोरोनामुक्त; सध्या एकही रुग्ण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 07:22 AM2021-06-24T07:22:43+5:302021-06-24T07:22:55+5:30
सध्या एकही रुग्ण नाही; पालिका प्रशासनाची माहिती
मुंबई : कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होत असतानाच दुसरी लाट आली. ती लाटही ओसरत असताना राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचे एप्रिल महिन्यात मुंबई शहर, उपनगरात दोन रुग्ण आढळून आले होते; हे दोन्ही रुग्ण बरे झाले असून, सध्या मुंबईत डेल्टा प्लस विषाणूचा एकही रुग्ण नसल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने पालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील नऊ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील सात, मुंबई दोन आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई शहर, उपनगरात डेल्टा प्लस विषाणूचे दोन रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आले होते. मात्र, ते दोन्ही रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत या विषाणूचा एकही रुग्ण नसल्याची माहिती काकाणी यांनी दिली. मास्क लावा, हात सतत धुवत राहा, तसेच गर्दीत जाऊ नका. ही कोरोना विषाणूपासून बचावासाठी त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीचे पालन केल्यास कोरोना, डेल्टा प्लस किंवा कोणत्याही प्रकारच्या विषाणूची बाधा नागरिकांना होऊ शकत नाही. यामुळे मुंबईकरांनी कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहनही काकाणी यांनी केले.
उत्परिवर्तनामुळे तयार झाला नवा व्हेरिएंट
देशात सर्वप्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी. १.६१७.२ या कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून विषाणूचा डेल्टा प्लस हा नवा व्हेरिएंट तयार झाला आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही, हे समजून घेण्यासाठी संशोधन सुरू आहे.
कोरोना विषाणू हा वारंवार आपले रूप बदलताना दिसून येत आहे. आधी आफ्रिका, मग लंडन आणि अशाच काही देशांनंतर भारतातही या विषाणूचे नवे स्ट्रेन दिसून आले आहेत. देशातील या स्ट्रेन्सना डेल्टा आणि काप्पा अशी नावे देण्यात आली होती.यामधील डेल्टा स्ट्रेनचा ‘डेल्टा प्लस’ हा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच, कोरोनावर उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा या व्हेरिएंटवर कितपत परिणाम होतो याबाबतही साशंकता आहे.